11 हजार 500 फूट उंचीवर बनणार पासपोर्ट
By Admin | Published: June 15, 2017 04:26 PM2017-06-15T16:26:59+5:302017-06-15T16:29:06+5:30
जम्मू काश्मीरमधील लेह येथे लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - डोंगराळ प्रदेशात 11 हजार 500 फूट उंचीवर पासपोर्ट बनवण्याची सुविधा मिळू शकते का ? नक्की मिळू शकते. जम्मू काश्मीरमधील लेह येथे लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपुर्वी पोस्ट ऑफिसशी हातमिळवणी करत मुख्य 86 पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत लेहचीदेखील निवड करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी डी एम मुले यांनी सांगितलं आहे की, "सध्या तिथे पायलट प्रोजेक्ट चालवला जात आहे. लवकरच सामन्यांसाठी हा खुला करण्यात येईल".
एकदा कामकाज सुरु झाल्यानंतर पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अपॉईंटमेंट मिळाल्यानंतर सर्व औपचारिकता पुर्ण केल्या जातील. डिसेंबर महिन्यात नियम शिथील केल्यापासून पासपोर्ट बनवणा-यांच्या संख्येत 50 टक्के वाढ झाली आहे.
येत्या दोन वर्षांत सर्व 800 जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र सरकारची सर्व जिल्ह्यांतील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितलं होतं की, या वर्षी 150 पोस्ट ऑफिस सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. तसेच दोन वर्षांच्या आत 800 मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली होती.
सेवा केंद्राची सुविधा सर्व जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पासपोर्ट बनल्यानंतर तो घरपोच पोहोचवण्याचं काम पोस्ट ऑफिस करणार आहेत.