पासपोर्टला चीप, मेपासून प्रारंभ, 70 देशांमध्ये प्रक्रिया सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 12:19 PM2023-04-02T12:19:21+5:302023-04-02T12:20:06+5:30
विदेश मंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांची माहिती
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सध्याच्या पासपोर्टच्या जागी ई-पासपोर्ट आणण्याची तयारी भारत सरकारने चालविली आहे. मे महिन्यात एका पथदर्शक प्रकल्पांतर्गत ई-पासपोर्टचे वितरण सुरू होईल, असे विदेश मंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ई-पासपोर्ट बुकलेटच्या स्वरूपात असेल. मात्र, त्यात एक इलेक्ट्रॉनिक चिप लावलेली असेल. या चिपमध्ये संबंधित व्यक्तीचा सर्व तपशील असेल. संगणक सेंसरच्या जवळ नेल्यास हा तपशील संगणकाच्या पडद्यावर उघडेल. पहिल्या टप्प्यात १० लाख ई-पासपोर्ट जारी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी काळात केवळ ई-पासपोर्टच मिळतील. ७० देशांत भारतीयांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया सोपी होईल. ४.५ कोटी बुकलेट्सची ऑर्डर आगामी ४ ते ५ वर्षांसाठी देण्यात आली आहे. पहिल्या वर्षी ७० लाख बुकलेट छापले जातील.
जूनपर्यंत तयार होणार पूर्ण नेटवर्क- ई पासपोर्टसाठी आवश्यक मॅनेजमेंट सीस्टिम, इंटरऑपरेबिलिटी टेस्ट बेड, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट, ई-पर्सनलायजेशन, ई-पासपोर्ट व्हेरिफिकेशन, इमिग्रेशन चेकपोस्ट इ. स्वरूपातील तांत्रिक नेटवर्क जूनपर्यंत पूर्ण होईल.
छपाई नाशिकला होणार- सध्या भारतात १० कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत. ते सर्वच बदलून ई-पासपोर्ट जारी केले जातील. चिप असलेल्या बुकलेटची छपाई नाशिकमधील भारतीय प्रतिभूती मुद्रणालयात केली जाणार आहे.