पतंजली कधीच खोटा प्रचार करत नाही, मेडिकल माफिया अपप्रचार करत आहे: बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:18 PM2023-11-22T17:18:51+5:302023-11-22T17:19:14+5:30
'आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत.'
Patanjali Baba Ramdev: मॉडर्न मेडिसिन सिस्टमविरोधात खोटे आणि दिशाभूल करणारे दावे प्रकाशित करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने काल पतंजली आयुर्वेदला कडक ताकीद दिली होती. या संदर्भात बाबा रामदेव यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बाबा रामदेव यांनी आपली बाजू मांडली. 'पतंजली खोटा प्रचार करत नाही. काही स्वार्थी लोक पतंजलीविरोधात खोटा प्रचार करत आहेत. अॅलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राद्वारे खोटेपणा पसरवला जातोय. आम्ही कोर्टासमोर शेकडो ठीक झालेल्या रुग्णांना आणायला तयार आहोत. आम्ही आमचे सर्व संशोधनही न्यायालयात दाखवण्यास तयार आहे,' अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
'सर्वोच्च न्यायालय, देशाचा कायदा आणि संविधानाचा आदर करतो. आम्ही खोटा प्रचार करत नसून डॉक्टरांची टोळी आयुर्वेद आणि योगाचा अपप्रचार करत आहे. बीपी, शुगर, थायरॉईड, दमा, यकृत, किडनी यावर जगात उपाय नाही, असा अपप्रचार चालवला जातोय. आमच्याकडे दररोज शेकडो रुग्ण येतात. जास्त वजन असलेल्या रुग्णांचा लठ्ठपणा 8 ते 10 दिवसात कमी होतो,' असा दावाही त्यांनी यावेली केली.
बाबा रामदेव पुढे म्हणतात, 'आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत. सुप्रीम कोर्टासमोर ठीक झालेल्या रुग्णांना आणायला तयार आहोत. आमच्याकडे ज्ञान आणि विज्ञानाचा खजिना आहे. पण गर्दीच्या जोरावर सत्य आणि असत्य ठरवता येत नाही. मेडिकल माफिया खोटा प्रचार करतात. पतंजली कधीही खोटा प्रचार करत नाही. जे खोटे पसरवले जात आहे, ते उघड झाले पाहिजे. आजारांच्या नावाखाली लोकांना घाबरवले जात आहे. पतंजलीने स्वदेशी चळवळीला चालना दिली आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.