चूक असेल तर 1000 कोटींचा दंड करा, फाशी द्या; SC च्या सूचनेवर काय म्हणाले बाबा रामदेव?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:28 PM2023-11-22T18:28:40+5:302023-11-22T18:29:28+5:30
...तर आम्हाला 100 ऐवजी 1000 कोटी रुपयांचा दंड करा. आम्हाला फाशीची शिक्षाही द्या, स्वीकार आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते बुधवारी हरिद्वारमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
अॅलोपॅथीवर निशाना साधण्यावरून आणि औषधांसंदर्भात खोटे दावे केल्याच्या आरोपांवरून सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला ताकीद दिली होती. एवढेच नाही, तर आजार बरा करण्यासंदर्भातील आपल्या प्रोडक्ट्सचा दावा खोटा आढळून आला, तर 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने ही टिप्पणी केली होती. यानंतर आता बाबा रामदेव यांनी याप्रकरणावर भाष्य केले आहे. जर आम्ही चुकीचे आढळलो तर आम्हाला 100 ऐवजी 1000 कोटी रुपयांचा दंड करा. आम्हाला फाशीची शिक्षाही द्या, स्वीकार आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते बुधवारी हरिद्वारमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
बाबा रामदेव म्हणाले, 'खोटा प्रचार कराल तर कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेपतंजलीला फटकारले आहे, अशा आशयाचे वृत्त कालपासून माध्यमांच्या हजारो साइट्सवर व्हायरल केले जात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्या संविधानाचा आदर करतो. मात्र आम्ही खोटा प्रचार करत नाही. डॉक्टरांच्या एका टोळीने एक अशी संघटना तयार केली आहे की, जी अपप्रचार करते. ते आपल्या संस्कृती आणि शाश्वत मूल्यांच्याही विरोधात बोलतात. बीपी, शुगर, थायरॉइड आणि लिव्हरसारख्या आजारांवर कसलाच इलाज नाही, असा त्यांचा खोटा प्रचार आहे. मात्र आमच्याकडे हजारो रुग्ण येतात. आमच्याकडे त्यांच्यावर जे काही केले गेले त्याचे पुरावेही आहेत. आम्ही तर एका आठवड्यात 12 ते 15 किलोपर्यंत वजनही कमी करतो.'
राम देव म्हणाले, जर आम्ही खोटे बोलत नसू, तर जे खोटा प्रचार करत आहेत, त्यांना हा दंड करायला हवा. गेल्या 5 वर्षांपासून जबरदस्त प्रचार सुरू आहे. योग, आयुर्वेद आणि नॅच्युरोपॅथीला खोटे ठरवण्यासाठी, आयुर्वेदात कशाचाही इलाज नाही, असा प्रचार सुरू आहे. खरे तर बाबा रामदेव यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाच्या खंडपीठाने पतंजलीला खोटी प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला दिला होता.