‘फ्युचर रिटेल’च्या स्टोअर्समध्ये पतंजली ब्रँड तिसऱ्या स्थानी
By admin | Published: August 27, 2016 04:41 AM2016-08-27T04:41:02+5:302016-08-27T04:41:02+5:30
भारतभरातील स्टोअर्समध्ये गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) श्रेणीत बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या वस्तूंनी विक्रीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली
नवी दिल्ली : ‘फ्युचर रिटेल’ कंपनीच्या भारतभरातील स्टोअर्समध्ये गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) श्रेणीत बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या वस्तूंनी विक्रीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
फ्युचर समूहाचे सीईओ किशोर बियाणी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या क्रमांकावर हिंदुस्तान युनिलिव्हर असून, दुसऱ्या स्थानी प्रॉक्टर अॅड गॅम्बल आहे. पतंजली तिसऱ्या स्थानी आले आहे. फ्युचरच्या फडताळात पतंजलीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये प्रवेश केला होता. पतंजलीपाठोपाठ जीसीपीएल, डाबर आणि इमामी हे ब्रँड आहेत. दरमहा सुमारे २0 टक्क्यांची वाढ कंपनी करीत आहे.
बियाणी यांनी सांगितले की, श्री श्री रविशंकर प्रणीत श्री श्री आयुर्वेदची एफएमसीजी उत्पादने विकण्याची आमची योजना आहे. त्यासाठी सध्या बोलणी सुरू आहे. फ्युचर समूहामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात समूहाला २६ हजार कोटी ते २७ हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, असे बियाणी यांनी सांगितले.
पूजा साहित्यातही उडी
पतंजली उद्योग समूहाने पूजा साहित्य क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पतंजली आस्था’ या नावाने शंभरपेक्षाही जास्त उत्पादने पतंजलीकडून बाजारात उतरविण्यात येणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिवाळीपूर्वी दीड हजार डीलर्ससोबत करार
पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, अनेक नामांकित कंपन्या अगरबत्ती आणि धूप यांसारख्या उत्पादनांत रसायने मिसळत असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. हे ग्राहकांसाठी हानिकारक आहे. आम्ही नैसर्गिक उत्पादने बाजारात उतरविणार आहोत. दिवाळीपूर्वीही आम्ही १,५00 डीलरांसोबत करार करीत आहोत. यांच्या तीन लाक्षांपेक्षा जास्त स्टोअर्समधून आमचे पूजा साहित्य दिसेल.