पठाणकोट हल्ला: पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान
By admin | Published: January 2, 2016 08:42 AM2016-01-02T08:42:12+5:302016-01-02T18:14:45+5:30
पंजाबच्या पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले अाले असून आणखी ३ दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. २ - पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या पाचही पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चार दहशतवाद्यांना काही तासांतच लष्कराच्या जवानांनी ठार केले होते, परंतु एक दहशतवादी लपून बसला होता. अखेर १५ तासांची कारवाई संपुष्टात येताना पाचव्या व शेवटच्या दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या इमारतीजवळून स्फोटाचे दोन मोठे आवाज आले व नंतर दुपारपासून चकमक सुरू होती. जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले असून अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.
लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर अन्य एका जवानाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सुमारे पाच तासांच्या चकमकीनंतर ही मोहिम संपुष्टात आली, मात्र त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या तळावरून पुन्हा गोळीबाराचे व स्फोटांचे आवाज येऊ लागल्याने तेथे आणखी काही दहशतवादी लपल्याचे स्पष्ट झाले. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला असून भारताशी दहशतवाद निर्मूलनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
काल रात्रीच काही दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरूदासपूरचे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण केले व त्यांना मारहाण करून त्यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. त्याच दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे आणखी कुमक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक (सीमा) कुँवर विजयप्रताप सिंह यांची दिली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंजाबसह देशभरात अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर जम्मू-पठाणकोट हायवेही बंद करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अडथळे आणण्यासाठी हा हल्ला घडविला असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अजित डोवाल यांच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन
दरम्यान, या हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून आहेत. डोवाल व आयबीचे डायरेक्टर हे दोघेही नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसून या ऑपरेशनवर नजर ठेवून असून थोड्याच वेळात पंतप्रधानांना या हल्ल्याचा संपूर्ण वृत्तांत देण्यात येणार आहे.
पठाणकोट हल्ल्यातील महत्वाच्या घडमोडी :
- लष्कराच्या गणवेषात आलेले दहशतवादी पहाटे तीनच्या सुमारास पठाणकोट हवाईतळावर घुसले आणि त्यांनी तीन दिशांना अंदाधुद गोळीबार केला.
- सुरक्षा दलाचे जवान व अतिरेक्यांमध्ये सुमारे ५ तास जोरदार धुमश्चक्री सुरु होती. अखेर चारही दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले, मात्र त्यासाठी २ जवानांना प्राणाहुती द्यावी लागली.
- ज्या हवाईतळावर हा हल्ला झाला, तो हवाईदलाचा ‘फायटर’ बेस आहे.
- काल रात्री ज्या दहशतवाद्यांनी गुरदासपूरच्या एसपींची कार पळवली, त्यांनीच हा दहशतवादी हा हल्ला केल्याचा संशय आहे.
- हल्ला पाकिस्तानातून आलेल्या दहशवाद्यांनी केल्याचा संशय आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.
- हे अतिरेकी पाकिस्तानच्या बहावलपूरमधून सीमा पार करून भारतात घुसले व त्यानंतर जम्मू-काश्मीर मार्गे पंजाबमध्ये घुसल्याची माहिती मिळत आहे.
- या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर, हिमाचल व चंदीगढच्या दिशेने जाणा-या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
- या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबसह संपूर्ण देशात हायअर्लट देण्यात आला असून राजधानी दिल्लीतील बंदोबस्तही वाढवण्यात आला.