पठाणकोट हल्ला; अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर -सोनिया
By admin | Published: January 5, 2016 12:36 AM2016-01-05T00:36:17+5:302016-01-05T00:36:17+5:30
देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच
नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांनी जवानांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला.
सुरक्षा जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करीत त्यांनी या मोहिमेतील योगदानाचा उल्लेख केल्याचे काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुप्तचर संस्थांनी पूर्वसूचना देऊनही अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे केंद्र सरकार पावले उचलेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
नागरिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संस्थांच्या सुरक्षेची बाब गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले.
1 पंजाब पोलीस अधीक्षकांचे अपहरण झाल्यानंतर अलर्ट जारी होण्याआधीच अतिरेक्यांनी पठाणकोटच्या हवाई तळाच्या परिसरात प्रवेश केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरेक्यांनी लष्करी तंत्राचा पुरेपूर वापर करीत घुसखोरीचा डाव साधला, असे सुरक्षा संस्थांच्या सूत्रांनी म्हटले आहे.
2 पठाणकोट एअरबेससह महत्त्वाच्या सुरक्षासंस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना हल्ला करता येऊ नये यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. अतिरेकी १ जानेवारीच्या सकाळीच या परिसरात शिरले असावे, कारण काही तासांतच संध्याकाळी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
3 पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांनी सादर केलेल्या माहितीची शहानिशा करण्यात काही तास वाया गेले. अतिरेक्यांनी माझ्यासह अन्य दोघांचे अपहरण केले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. सलविंदरसिंग यांनी अतिरेक्यांबाबत माहिती देऊनही ही बाब गांभीर्याने घेण्यात न आल्यामुळे महत्त्वाचे काही तास वाया गेले.
मोदी सरकारच्या पाकिस्तानसंबंधी विदेश धोरणात सातत्य नसल्यामुळे देशाच्या सीमा कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित बनल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी भाषणांमधून पाकिस्तानसंबंधी धोरणात बदल होण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांचे धोरण निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे.
- मायावती, बसपा अध्यक्षा