पठाणकोट हल्ला पाकमधूनच, अमेरिकेने दिले भारताला पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 09:32 PM2016-08-29T21:32:58+5:302016-08-29T21:32:58+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या हल्ल्याप्रकरणी जैश ए मोहंमद प्रमुख मसूद अझहरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याच्या पर्यायाची चाचपणी करीत असतानाच ही घडामोड घडली.
जानेवारीतील या हल्ल्याचे सूत्रधार असलेले जेईएमचे दहशतवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटचा आणि संघटनेची आर्थिक शाखा असलेल्या अल रहमत ट्रस्टच्या वेबसाईटचा आयपी अॅड्रेस पाकमधील असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अमेरिकेने एनआयएला दिली आहे. जैशचा दहशतवादी कासिफ जान याचे मित्र फेसबुकवरील जिहाद, जेईएमशी संबंधित ग्रुपचे सदस्य असून, या ग्रुपच्या पानावर पठाणकोट हल्ल्यात मारले गेलेले चार दहशतवादी नासिर हुसैन, हाफिज अबू बकर, उमर फारुक आणि अब्दुल कय्युम यांचे फोटो आहेत.
हल्ल्याच्या वेळी अल रहमत ट्रस्टचे वेबपेज रंगोनूर डॉट कॉम आणि अलकआलम आॅनलाईन डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. तारिक सिद्दीकी नावाची व्यक्ती या दोन्ही साईटस्चे काम पाहतो. रफाह ए आलम सोसायटी, मालिर, कराची असा या वेबसाईटस्चा पत्ता आहे. या सर्व वेबसाईटस् आणि आयपी अॅड्रेस पाकमधील असून, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी अपलोड करण्यात आले होते, याची अमेरिकेने पुष्टी केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केल्यानंतर पठाणकोट येथून हल्लेखोर ज्या मोबाईल क्रमांकावर जानशी बोलत होते, तोच क्रमांक जान त्याच्या फेसबुक अकाऊंटसाठी वापरत होता, असे तपासात आढळून आले.
दहशतवाद्यांनी पाकमधील आणखी एका दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला होता. हा क्रमांक मुल्ला दादुल्ला याच्या फेसबुक अकाऊंटशी संलग्न होता. पठाणकोट हल्ल्याच्या वेळी ही खाती आणि आयपी अड्रेस वापरण्यात आला होता, असेही तपासात आढळून आले.