पठाणकोट हल्ला: SP सलविंदर सिंहना एनआयएची क्लीन चीट
By Admin | Published: January 23, 2016 10:16 AM2016-01-23T10:16:52+5:302016-01-23T10:17:14+5:30
पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलीसचे वरीष्ठ अधिकारी सलविंदर सिंग यांना एनआयएने क्लीन चिट दिली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २३ - पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलीसचे वरीष्ठ अधिकारी सलविंदर सिंग यांना एनआयएने क्लीन चिट दिली आहे. सिंह यांची घेण्यात आलेली वैज्ञानिक चाचणी तसेच लाय डिटेक्टर चाचणीतही काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
अधिक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत असलेले सलविंदर सिंग गुरुवारी एनआयएच्या दिल्लीतील मुख्यालयात आले होते. तेथे त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले व त्यानंतर त्यांची लाय डिटेक्टर चाचणीही घेण्यात आली होती, पण त्यात काही आढळले नाही.
पठाणकोटच्या तळावर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर सर्वप्रथम सलविंदर सिंग यांचे अपहरण केले व काहीवेळाने त्यांना सोडून दिले. ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे या घटनेसंदर्भात सलविंदर सिंग यांनी सांगितले होते. मात्र सलविंदर सिंह यांनी चौकशीमध्ये एनआयएला जी माहिती दिली त्यामध्ये विसंगती दिसत असल्याने नेमके सत्य शोधण्यासाठी त्यांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.