पठाणकोट हल्ला: हवाई तळावरील संशयित कर्मचा-याला अटक
By admin | Published: January 8, 2016 11:47 AM2016-01-08T11:47:44+5:302016-01-08T11:51:08+5:30
पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली हवाई दलाच्या तळावरील एका कर्मचाऱ्यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. ८ - पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली हवाई दलाच्या तळावरील एका कर्मचाऱ्यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा समावेश असल्याचा दावा भारताने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने केला आहे. असगर हा आयसी-८१४ या विमानाच्या कंदहार अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता. लाहोरजवळ या हल्ल्याचा कट रचल्याचा दावाही तपास संस्थेने केला असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी स्पष्ट केले. हल्ल्यात सहभागी चौघांबाबत विस्तृत माहिती पाकिस्तानला योग्य माध्यमातून पुरविण्यात आली आहे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठाणकोट हल्ल्याचा तपास करणा-या पथकाने हवाई दलाच्या तळावरील एका संशयित कर्मचा-यास तपासासाठी ताब्यात घेतले असून तो लष्करी व अभियांत्रिकी सेवेत कार्यरत आहे. संपूर्ण हवाई दलाच्या तळावरील दिवे रात्रीच्या वेळी सुरू होते, मात्र जी ११ फुटी उंच भिंत चढून दहशतवादी तळावर घुसले त्याच भागातील दिवे बंद होते, अशी माहिती समोर आली आहे. ज्या भागातून दहशतवादी घुसले होते तो भाग अटक करण्यात आलेल्या कर्मचा-याच्या विभागाच्याच बाजूला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संशयाची सुई त्या कर्मचा-याकडे वळत असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले.
दहशतवाद्यांचा म्होरक्या पाकिस्तानीच
दरम्यान हल्यावेळी अतिरेक्यांना पाकिस्तानातूनच संपर्क होत असल्याची माहिती मिळत असून अतिरेक्यांनी पाकिस्तानातील मुख्य सूत्रधाराशी चर्चा केल्याचे समजते. याप्रकरणी पाकिस्तानमधील दोन फोन नंबर्सचा खुलासा झाला असून +९२-३०१७७७५२५३ हा क्रमांक पठाणकोट हल्ल्यातील एका अतिरेक्याच्या आईचा मोबाईल नंबर असून +९२-३०००५९७२१२ असा आहे. मात्र तो कोणाचा आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. +९२ हा पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. दुस-या नंबरवर ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी फोन करण्यात आला होता. भारतीय टॅक्सीचालक इकागर सिंह याचा फोन हिसकावून दहशतवाद्यांनी हा फोन केला होता. दहशतवाद्यांनी इकागर याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिला. तपास पथकाल इकागरचा मृतदेह मिळाला असून त्याची हत्या दहशतवाद्यांनीच केल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले.
गुरूदापूरसमध्ये दिसले २ दहशतवादी?
तपास पथकाकडून पठाणकोट हल्ल्याचा तपास सुरू असतानाच रहिवाशांनी गुरूदासपूरमध्ये २ दहशतवादी असल्याची शंका व्यक्त केली. लष्करी गणवेशातील दोन व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसल्यावर स्थानिकांनी त्यांना हटकले असता ते ऊसाच्या शेतात लपल्याचे वृत्त आहे. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पंजाब पोलिस व लष्कराने कसून शोध घेण्यास सुरूवात केली आहे.