पठाणकोट : कर्मचारीच अतिरेक्यांना फितूर?

By admin | Published: January 9, 2016 03:40 AM2016-01-09T03:40:28+5:302016-01-09T03:40:28+5:30

पठाणकोट हवाईदल तळावर लष्कराच्या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असताना आणखी दोन दहशतवादी या परिसरात दडून बसले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Pathankot: Employees frustrate terrorists? | पठाणकोट : कर्मचारीच अतिरेक्यांना फितूर?

पठाणकोट : कर्मचारीच अतिरेक्यांना फितूर?

Next

पठाणकोट/नवी दिल्ली : पठाणकोट हवाईदल तळावर लष्कराच्या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असताना आणखी दोन दहशतवादी या परिसरात दडून बसले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना घुसण्यास मदत केल्याच्या संशयावरून हवाई तळावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांनी पठाणकोट हवाई तळावर घुसण्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. देशाशी बेइमानी करून दहशतवाद्यांना फितूर होत त्यांना माहिती पुरविल्याचा संशय यापैकी एकावर आहे. संबंधित संशयित कर्मचारी हा लष्करी अभियांत्रिकी सेवा विभागात कार्यरत आहे. अलीकडेच त्याची या हवाईतळावर नियुक्ती करण्यात आली होती.
दहशतवाद्यांनी ज्या भिंतींवरून हवाई तळामध्ये घुसखोरी केली त्या ठिकाणचे दिवे त्यावेळी बंद होते आणि ही जागा लष्करी अभियांत्रिकी सेवा विभागाच्या देखभाल कार्यशाळेच्या जवळच आहे. या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने फ्लड लाईटस्ची दिशा बदलून दहशतवाद्यांना घुसण्यास मदत केली, असा संशय आहे. गुरुदासपूर परिसरात दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा सामना करणारा आणखी एक प्रत्यक्षदर्शी समोर आला आहे. लष्करी पोशाख आणि हातात बंदुका घेतलेल्या या दहशतवाद्यांनी तुमची प्लॅटून कुठे तैनात आहे? अशी विचारणा आपल्याला केल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान लष्कर, स्वॅट आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुदासपूरच्या मुकेरिया मार्गावर पंढेर गावातील उसाच्या शेतात शुक्रवारी शोधमोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे रावी नदीच्या पलीकडे मम्मीचक राजा गावातही सकाळी शेतांमध्ये लोकांनी दोन संशयितांना बघितले. तिबडी छावणीलगतच्या गावात राहणाऱ्या २१ वर्षीय लव्हप्रीतसिंगच्या सांगण्यानुसार गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास लष्करी पोशाखातील दोन सशस्त्र तरुण त्याला भेटले होते. या तरुणांनी त्याची बाईक थांबवून लष्कराच्या तैनातीबद्दल त्याला विचारणा केली. ‘रुक रुक’ असे म्हणत त्यांनी मला थांबविले आणि ‘तुम्हारी प्लॅटून कहा बैठी है’ अशी विचारणा केली, असे लव्हप्रीतसिंगचे म्हणणे आहे. या दोघांच्या भाषेवरून संशय आल्याने लव्हप्रीतने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याच्या खांद्यावर मारले. या घटनेची माहिती त्याने लगेच सेना चौकीत दिली. यापूर्वी पंधेर जिल्ह्यातील दोघांनी शेतात दोन संशयितांना बघितल्याचा दावा केला होता. (वृत्तसंस्था)
हा घ्या पुरावा : हल्लेखोरांचा पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क

पाकिस्तानातील नवाज शरीफ सरकारला पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणारे सहा दहशतवादी त्यांच्या देशाचे नागरिक होते याबद्दल संशय असल्यास त्यांनी हे मोबाईल फोन तपासून खात्री करून घ्यावी. +९२-३०१७७७५२५३ आणि +९२-३०००५९७२१२ या दोन क्रमांकावरील कॉल डिटेल्स सर्व काही सांगतील.हे दोन्ही पाकिस्तानचे दूरध्वनी क्रमांक असून हल्लेखोर दहशतवादी भारतात घुसल्यावर सतत या दोन क्रमांकावर संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.

+९२-३०१७७७५२५३ हा क्र मांक एका अतिरेक्याच्या आईचा मोबाईल नंबर असून दुसरा क्रमांक +९२-३०००५९७२१२ हल्लेखोरांच्या एका म्होरक्याचा आहे. +९२ हा पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. दुसऱ्या नंबरवर ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी फोन करण्यात आला होता. दहशतवादी त्यांच्या म्होरक्याला ‘उस्ताद’ असे संबोधत होते. भारतीय टॅक्सीचालक इकागर सिंह याचा फोन हिसकावून दहशतवाद्यांनी हा फोन केला होता. दहशतवाद्यांनी इकागर याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिला. तपास पथकाला इकागरचा मृतदेह मिळाला असून त्याची हत्या दहशतवाद्यांनीच केल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले.
सत्यता जाणून घेण्यासाठी एनआयए करणार सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफ चाचणी
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) दहशतवाद्यांनी अपहरण केलेले गुरु दासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे. सलविंदरसिंग यांनी चौकशीमध्ये दिलेल्या माहितीत प्रचंड विसंगती दिसत असल्याने नेमके सत्य शोधण्यासाठी एनआयएकडून त्यांची पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते. भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री सलविंदरसिंग आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोघांचे अपहरण करून नंतर त्यांना सोडून दिले होते.

पठाणकोट येथील गुरु द्वारामध्ये मी नियमित दर्शनाला जायचो असे सलविंदरसिंग यांनी चौकशीत सांगितले आहे. मात्र गुरु द्वाराची देखभाल करणाऱ्या सोमराज याने ३१ डिसेंबरच्या रात्री पहिल्यांदाच मी सलविंदर यांना भेटलो असा दावा केला आहे. याशिवायही या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे नेमके तथ्य जाणून घेण्यासाठी सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते. दिल्ली किंवा बंगळुरू येथे त्यांना चाचणीसाठी नेण्यात येईल,असे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांना अद्याप अटक झाली नसून त्यांनी या चाचणीसाठी सहमती दिलेली नाही.
अपहरणाबाबत विसंगत माहितीमुळे निर्माण झाले अनेक प्रश्न
सलविंदरसिंग यांनी २२ किलोमीटरचा थेट मार्ग न निवडता ५५ कि. मी.च्या कठुआ मार्गाने प्रवास
का केला?
धार्मिक स्थळावरील सेवादाराने ते रात्री ९ वाजता आले असे खोटे सांगितले. कारण त्यांची गाडी
रात्री १०.१७ वा. क्रॉस झाल्याचे टोल प्लाझाच्या
फुटेजमध्ये आहे.
एसपींचे मित्र राजेश वर्माने दहशतवाद्यांना अमली पदार्थांचे तस्कर समजून गाडी थांबविली होती काय? तस्करांच्या इशाऱ्यावरच दहशतवाद्यांनी सलविंदरसिंग यांना कुठलीही दुखापत केली नाही काय?
एवढ्या रात्री सीमा क्षेत्रात जाताना त्यांनी आपल्या अंगरक्षकास सोबत का घेतले नाही?
सलविंदरसिंग रात्री ९ वाजता दर्ग्यातून निघाले आणि ११.३०
ते १२ वाजताच्या दरम्यान त्यांचे अपहरण झाले.
दर्ग्यापासून हे स्थळ १३ कि.मी. अंतरावर आहे. हे अंतर पूर्ण करण्यास त्यांना तीन तास का लागले?
भारतीय पुराव्यानुसार चौकशी करण्याचे पाक गुप्तचरांना आदेश
इस्लामाबाद : पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेल्या पुराव्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना दिले. प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी दिलेल्या वृत्तांनुसार शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक होऊन तीत पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली, असे ‘द नेशन’ने म्हटले. भारताने जे पुरावे दिले त्यानुसार चौकशी करण्यास शरीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयारी दाखविली असे ‘द नेशन’ने म्हटले. भारताने दिलेले पुरावे गुप्तचर विभागाचे प्रमुख आफताब सुलतान यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. दहशतवादाविरुद्ध भारताशी सहकार्य वाढविण्यास पाकिस्तान तयार असल्याचे शरीफ यांनी या बैठकीत सांगितले होते.
वॉशिंग्टन : भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची ‘सर्वांगीण, स्वच्छ आणि पारदर्शी’ चौकशी करावी असे अमेरिकेने पाकिस्तानकडे आग्रह धरला आहे. या चौकशीचा निष्कर्ष आम्हाला बघायचा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी गुरुवारी सांगितले.आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे की सर्वांगीण, पूर्ण, न्याय आणि पारदर्शी चौकशी प्रक्रिया सुरू होईल. या चौकशीचा निष्कर्ष आम्हाला बघायचा आहे. शिवाय ही चौकशी लवकरात लवकर करायची असून जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा तिच्यावर पारदर्शी चर्चा व्हावी.
हल्ले शांतताविरोधी
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियोजित शांतता बोलणी उधळून लावण्यासाठीच पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर आणि अफगाणिस्तानातील दूतावासावर दहशतवादी हल्ले करण्यात आले, असे अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर मार्क वॉर्नर यांनी म्हटले.

Web Title: Pathankot: Employees frustrate terrorists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.