पठाणकोट हल्लेखोराची युपीए सरकारने केली होती सुटका
By admin | Published: May 17, 2016 03:03 PM2016-05-17T15:03:41+5:302016-05-17T15:03:41+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 17 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस सरकारने भारतीय जनता पक्षाची (भाजपा) कोंडी करण्याचा प्रयत्न केला असताना आता काँग्रेसच गोत्यात येण्याची शक्यता आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती. जानेवारी महिन्यात पंजाबमधील पठाणकोट एअर बेसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी शाहीद लतीफवर होती. पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी युपीए सरकारने 2010 मध्ये शाहीद लतीफची सुटका केली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शाहीद लतीफला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यावरुन अटक करण्यात आली होती. 11 वर्ष तो कारागृहात होता. 28 मे 2010 मध्ये लष्कर-ए-तोयबा, हिजाब-उल-मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्महदच्या 25 दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये शाहीद लतीफचादेखील समावेश होता. शेजारी राष्ट्र पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी यांची सुटका करण्यात आली होती. जम्मू, श्रीनगर, आग्रा, वाराणसी, नैनी आणि तिहारमधील कारागृहात हे सर्व दहशतवाही बंदिस्त होती. वाघा बॉर्डरमार्गे त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जेव्हा अपहरण केलं होतं तेव्हा शाहीद लतीफच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. 154 प्रवाशांना त्यावेळी बंधक म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याबदल्यात मसुद अजहर आणि अतर दोघांची सुटका करण्यात आली होती. मात्र वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांच्या यादीतील शाहीद लतीफ आणि इतर 31 जणांची सुटका करण्यास नकार दिला होता.
1999 मध्ये एनडीए सरकारने मुश्ताक अहमद जरगार आणि ओमर शेख यांची सुटका केली होती. अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल यांचं अपहरण करुन त्यांनी हत्या केली होती.
दिल्लीत पठाणकोट हल्ल्याची तयारी -
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत छापेमारी करत 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये या तीन दहशतवाद्यांचादेखील समावेश आहे. चौकशी केली असता दिल्लीतील एअरबेस तसंच दिल्ली गाजियाबाद सीमारेषेवरील मॉलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली.दहशतवाद्यांचा म्होरक्या साजीदला उत्तर-पूर्व दिल्लीच्या चांदबाग नगरमधून अटक करण्यात आली होती. तर शाकीर आणि समीर यांनी उत्तरप्रदेश आणि गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती.
पठाणकोट हल्ला -
2 जानेवारीला पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये 7 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्यानंतर भारताने या हल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेल्याचे पुरावे दिले होते. तसंच या हल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाई करण्याची मागणी भारताने वारंवार केली होती.