12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:23 PM2022-08-04T12:23:47+5:302022-08-04T12:26:38+5:30
हे 35 लाख रुपये ATMमध्ये भरण्यासाठी जाणार होते, पण त्यापूर्वीच ही चोरी झाली.
चंदीगड:पंजाबच्या पटियालामधील एका एसबीआय बँकेच्या शाखेत 35 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा अवघा 12 वर्षांचा मुलगा आहे. चोरीच्या या घटनेने पोलीसही हैराण झाले आहेत. ही 35 लाख रुपयांनी भरलेली बॅग कॅशियरने एटीएममध्ये भरण्यासाठी ठेवली होती. काल(बुधवारी) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कॅशिअरच्या कॅबिनमध्ये घुसून त्याने ही बँग लंपास केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा एकटा नसून, त्याचा एक साथीदार होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बँग उचलून त्या मुलाला नीट चालताही येत नव्हते, नंतर बँकेच्या बाहेर पडताच त्याचा साथीदार ई-रिक्षात आला आणि मुलाला सोबत घेऊन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक तपासात या मुलाला बॅग चोरीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय कॅबिनमध्ये कुणालाही एंट्री नसते.
बँक कर्मचाऱ्यांची चौकशी
पोलिसांना या प्रकरणात काही अंतर्गत व्यक्तींवर चौकशी आहे. कारण, कॅशियरने फक्त तीन ते पाच मिनिटांसाठी बॅग दुर्लक्षित ठेवली होती. त्यामुळे आता बँकेतील त्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. पटियालाचे एसएसपी दीपक पारीक यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी टीम तयार करण्यात आली आहे.