Patiala Violence: पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:49 AM2022-04-30T11:49:07+5:302022-04-30T11:50:42+5:30
Patiala Violence: पटियालामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
Patiala Violence: पटियाला येथे शुक्रवारी खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पतियालामध्ये रात्री साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अफवा पसरू नयेत यासाठी पंजाब सरकारच्या गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. तसेच, पटियालाचे IG राकेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ एसपी आणि शहर एसपी यांनाही हटवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुखविंदर सिंग चिन्ना यांची पटियालाचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, दीपक पारिक यांची वरिष्ठ एसपी आणि वजीर सिंग यांची एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शहरात पोलिसांच्या 10 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून पोलीस फ्लॅग मार्च काढत आहेत.
हिंदू संघटनांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
या घटनेवर आज हिंदू संघटनांनी पटियाला प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत या घटनेत थेट सहभागी असलेल्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे हिंदू संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. हिंदू संघटनांनी आज पटियाला बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे हिंदू संघटनेच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
हिंसाचारात दोन पोलिसांसह चार जण जखमी
पटियाला येथील चकमकीच्या या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नानक सिंग यांनी सांगितले की, खलिस्तानविरोधी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. चकमकीदरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लोकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण
शुक्रवार(दि.29) शिवसेनेचे कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांनी खलिस्तान मुर्दाबाद मार्चची घोषणा केली होती. शिवसेना पंजाबला खलिस्तान होऊ देणार नाही, असे ते म्हणाले होते. सिंगला यांच्या घोषणेनुसार शुक्रवारी ठरलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले आणि खलिस्तान मुर्दाबादचा मोर्चा निघाला. यावेळी खलिस्तान समर्थक तिथे आले आणि दगडफेक सुरू केली. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यावेळी अनेकांनी तलवारीदखील उगारल्याचे पाहायला मिळाले.