हृदयद्रावक! रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दारात पण अर्धा तास दरवाजाच उघडला नाही अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:17 AM2022-08-31T10:17:41+5:302022-08-31T10:19:20+5:30
रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा उघडताच आला नाही.
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोझीकोडमध्ये रुग्णवाहिकेचा दरवाजा अर्धा तास न उघडल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्य़ाची भयंकर घटना समोर आली आहे. रुग्णाला रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना सोमवारी ही घटना घडली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा उघडताच आला नाही. यावेळी उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच तो अपयशी ठरला.
रुग्णवाहिकेचा दरवाजा अखेर खूप कष्टांनी कसा तरी उघडला गेला पण तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय रुग्ण कोयामोन यांना सोमवारी एका बाईकने धडक दिली होती. कोयामोन एका हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडत होते. दरम्यान, महामार्ग ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती खालावली.
डॉक्टरांनी रुग्णाला चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून कोझीकोड वैद्यकीय कॉलेजमध्ये नेण्यात आले. कोझीकोड मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर ज्या रुग्णवाहिकेतून त्यांना आणण्यात आले होते, तिचा दरवाजाच वेळेत उघडू शकला नाही.
रुग्णवाहिकेच्या चालकासह अनेकांनी रुग्णाला बाहेर काढण्यासाठी रुग्णवाहिकेचं दार उघडण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मात्र कुऱ्हाडीचा वापर केल्यानंतर दरवाजा तोडण्यात यश आले. यावेळी सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाया गेला. यानंतर दरवाजा उघडता आला, मात्र तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.