रुग्ण वाढीचा वेग मंदावला; बरे होण्याचे प्रमाण १३.६ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:12 AM2020-04-18T06:12:03+5:302020-04-18T06:12:14+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालय; २.७५ लाख खाटा तयार
नवी दिल्ली : लॉकडाउननंतर कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाउनआधी केवळ ३ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. आता ६.२ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होते. काही राज्यांमध्ये मोठी सुधारणा दिसत असून त्यात केरळ, ओडिशा या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील १३.६ टक्क्यांवर पोहोचले असल्याची सकारात्मक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी अधोरेखित केली. लॉकडाउनचा प्रभाव दिसू लागल्याचे ते म्हणाले.
देशात १,९१९ रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सज्ज आहेत. १ लाख ७३ हजार खाटा तयार आहेत. २१ हजार ८०० आयसीयू कक्ष उभारण्यात आले असल्याने भारत दिवसेंदिवस तयार होत आहे. आतापर्यंत देशात लाख १९ हजार ४०० जणांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी २८ हजार ३९० जणांची चाचणी करण्यात आली आहे. बीसीजी लसीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ठोस काहीही सांगता येणार नसल्याचे आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. बीसीजी लसीचा अभ्यास पुढच्या आठवड्यांपासून सुरू करू. सध्यातरी आमच्याकडे कोणतेही निष्कर्ष नाहीत. त्यामुळे बीसीजी लस कोरोनासाठी द्या, असे सांगता येणार नाही.