५० मिनिटे हृदय बंद पडूनही रुग्ण बचावला
By admin | Published: December 9, 2015 01:29 AM2015-12-09T01:29:22+5:302015-12-09T01:29:22+5:30
हृदय सुमारे ५० मिनिटे बंद पडूनही एक रुग्ण बचावण्याची वैद्यकीय चमत्कार वाटावा अशी विरळा घटना गुजरातमध्ये घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अहमदाबाद: हृदय सुमारे ५० मिनिटे बंद पडूनही एक रुग्ण बचावण्याची वैद्यकीय चमत्कार वाटावा अशी विरळा घटना गुजरातमध्ये घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अशा प्रकारे पुनर्जन्म झालेल्या या ५० वर्षांच्या रुग्णाचे नाव राजेंद्र पटेल असे असून ते साणंद येथील व्यापारी आहेत. पटेल यांना गेल्या आठवड्यात इस्पितळातून घरी सोडण्यात आले व आता त्यांची प्रकृती हळुहळु सुधारत आहे.
राजेंद्र पटेल यांचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरु करण्यासाठी
तातडीची अॅन्जीओप्लास्टी करण्यापूर्वी छातीवर पद्धतशीर दाब देऊन हृदय व फुफ्फुसे पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया (कार्डिओ पल्मोनरी रिसस्टीटेशन प्रोसिजर-सीपीआर) त्यांच्यावर १०० वेळा करण्यात
आली.
विशेष म्हणजे दोन शहरांमधील दोन इस्पितळांमधील डॉक्टरांनी व्हॉट्स अॅप आणि फोनवरून परस्परांशी संपर्क व समन्वय ठेवून पटेल यांना नवजीवन दिले.
साणंद येथील इस्पितळात
ज्यांनी सुरुवातीस राजेंद्र यांच्यावर उपचार केले त्या डॉ. आशिश सक्सेना यांनी सांगितले की, या रुग्णाला इस्पितळात आणले तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड बंद पडलेली होती. सुमारे ५० मिनिटे ‘सीपीआर’ व वीजेचे शॉक दिल्यानंतर त्यांची हृदयक्रिया पुन्हा सुरु झाली.
घुमा येथील एका कॉर्पोरेट हॉस्पिटलचे हृद्रोगतज्ज्ञ डॉ. रवी सिंघवी या संपूर्ण वेळात व्हॉट्स अॅप व फोनवर डॉ. सक्सेना यांच्या
संपर्कात राहून ‘सीपीआर’मध्ये
त्यांना मदत व मार्गदर्सन करीत
राहिले. डॉ. सिंघवी यांनी सांगितले की, एका टप्प्याला रुग्ण कोमामध्ये गेला व मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याने त्याच्या वाचण्याची शक्यताही कमी झाली होती. परंतु कालांतराने हृदय पुन्हा सुरु होऊन मेंदूलाही रक्तपुरवठा सुरु झाला व म्हणूनच तो आज जिवंत आहे. (वृत्तसंस्था)