रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 01:47 AM2018-12-09T01:47:00+5:302018-12-09T01:47:59+5:30
युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
नवी दिल्ली : युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. शुक्रवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) ४६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षणात बदल झाले आहेत म्हणून परवाना अशाच व्यक्तीला मिळावा ज्याच्याकडे उपचारांचे कौशल्य आहे. आम्हाला गुणवत्ता असलेल्या आरोग्यसेवा तयार करायला हव्यात व त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एका अहवालाचा संदर्भ देऊन नायडू म्हणाले, ‘भारतात एक हजार लोकसंख्येत फक्त १.१ पलंग उपचारासाठी रुग्णालयात आहेत, तर जगात हीच सरासरी २.७ आहे. भारताची ७० टक्के आरोग्यसेवा महत्त्वाच्या २० शहरांत आहे. नायडू यांनी युवा डॉक्टर आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा देऊन शहर आणि गाव यातील अंतर संपवून टाकू शकतात, असे म्हटले.
इतर देशांतून लोक भारतात येऊन मूत्रपिंड प्रत्यारोपण व गुडघे बदलण्याचे उपचार करून घेतात व त्याचवेळी अनेक भारतीयांना असे उपचार परवडत नाहीत. आम्हाला सगळ्या भारतीयांसाठी स्वस्तात उपचार सुनिश्चित करून या विरोधाभासी परिस्थितीतून बाहर यायला हवे. या दिशेने सरकारचा मेक इन इंडिया कार्यक्रम महत्त्वाचे पाऊल आहे, असे नायडू म्हणाले.
दीक्षांत समारंभात डॉ. ए.के. सराया, डॉ. समीरा नंदी, डॉ. कमल बक्षी यांना आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला. त्यांनी सर्वोच्च योग्यता मिळवणाऱ्या ३१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र दिले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नद्दा आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आदी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व त्याने समाजाला योग्य दिशा द्यावी ही त्याची जबाबदारी आहे, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले. त्या भारतीय जनसंचार संस्थानमध्ये आयोजित ५१ व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. त्यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात अटल बिहारी वाजपेयी मार्गाचे उद्घाटन झाले.
समारंभात ३३३ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमाची पदवी दिली गेली. यावेळी आयआयएमसीचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी संस्कृत भाषेत संस्थेने लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले.
दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठात झालेल्या सातव्या दीक्षांत समारंभात उपराज्यपाल अनिल बैजल युवक देशाचे भविष्य आहेत, असे म्हटले.