रुग्ण ‘वेटिंग’वर- कुठून आणायचे एवढे डॉक्टर?; अख्खा जगात आरोग्याचे तीन-तेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 09:10 AM2022-09-16T09:10:02+5:302022-09-16T09:10:30+5:30

एका संशोधनामध्ये तर आढळलं की कोरोनाकाळात कोरोना रुग्णांचीच संख्या इतकी प्रचंड होती आणि त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यानं अनेक रुग्णांलयात कोरोनाशिवाय इतर रुग्णांना भरतीच करून घेतलं गेलं नाही

Patients on 'waiting' - from where to bring so many doctors?; worst conditions of health in the whole world | रुग्ण ‘वेटिंग’वर- कुठून आणायचे एवढे डॉक्टर?; अख्खा जगात आरोग्याचे तीन-तेरा

रुग्ण ‘वेटिंग’वर- कुठून आणायचे एवढे डॉक्टर?; अख्खा जगात आरोग्याचे तीन-तेरा

googlenewsNext

संपूर्ण जगभरात आजही देवावर अनेकांचा भरवसा, विश्वास असला तरीही देवानंतर अनेकजण दुसरा क्रमांक लावतात, तो डॉक्टरांचा. कारण अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरच तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणतात, आणू शकतात, असा अनेकांचा आजही विश्वास आहे. अर्थात केवळ आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे, तर सर्वसामान्य परिस्थितीतही डॉक्टरचं आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करीत असतात. एखादे वेळी काही गोष्टी डॉक्टरांच्याही हातात नसतात, क्वचित त्यांच्याकडूनही एखादी चूक होऊ शकते; पण तरीही डॉक्टरांशिवाय जगात कोणाचंही पान हलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोविड काळात किती डॉक्टरांनी रात्रीचा दिवस केला आणि स्वत:चे प्राण धोक्यात घालून कितीजणांचे जीव वाचवले, याची गणती करणं अशक्य आहे. या काळात अक्षरश: २४ तास रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेल्या अनेक डॉक्टरांना कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचं बलिदानही द्यावं लागलं, अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरताही भासली, तेव्हा डॉक्टराचं महत्त्व आणखी अधोरखित झालं. 

आज परिस्थिती सर्वसामान्य होत असली तरीही युरोपात मात्र डॉक्टरांचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. त्यामुळे युरोपातील आरोग्य व्यवस्थाच जणू आजारी पडली आहे. युरोपात सध्या जवळपास पाच लाख डॉक्टरांची कमतरता जाणवते आहे. पश्चिम युरोपमध्ये तर अनेक विकसित देशही डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अडचणीत आले आहेत. ब्रिटनमध्ये जवळपास ६५ लाख लोक उपचारांच्या प्रतीक्षेत आहेत. २०१९च्या तुलनेत हा आकडा ५० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. स्पेनमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तिथेही ऑपरेशन करण्यासाठी नागरिकांना जवळपास १२३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते आहे. गेल्या अठरा वर्षांतला हा विक्रम आहे. कोविड काळाचा हा परिणाम आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोविडनंतर डॉक्टरांची कमतरता आणखी जास्त मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. 

कोरोनाकाळात आणि त्यानंतर युरोपच्या आरोग्यव्यवस्थेवर खूप माेठ्या प्रमाणावर अतिरिक्त ताण आला आहे. सध्या तर परिस्थिती इतकी खराब झाली आहे की, आपल्यावर उपचार व्हावेत, यासाठी रुग्णांना वाट तर पाहावी लागते आहेच; पण इतकंच नाही, काही रुग्ण तर सांगताहेत, आमच्यावर लवकर उपचार व्हावेत, यासाठी आम्हाला अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना लाचही द्यावी लागली. इम्पीरियल कॉलेजने नुकत्याच केलेल्या पाहणीत ही गोष्ट उघड झाली आहे. 

एका संशोधनामध्ये तर आढळलं की कोरोनाकाळात कोरोना रुग्णांचीच संख्या इतकी प्रचंड होती आणि त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यानं अनेक रुग्णांलयात कोरोनाशिवाय इतर रुग्णांना भरतीच करून घेतलं गेलं नाही. कोरोनाचा कहर संपल्यानंतर इतर आजारांचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात रुग्णालयांत दाखल होताहेत आणि त्यांना भरती करून घेतलं जातंय. युरोपात सध्या निव्वळ डॉक्टरांचीच पाच लाखांपेक्षा अधिक संख्येनं कमतरता जाणवते आहे; पण आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता तर यापेक्षा कितीतरी जास्त आहे. परिस्थिती सामान्य पातळीवर आणण्यासाठी युरोपात लगेचंच किमान दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. युरोपात आरोग्य व्यवस्थेच्या नाकालाच सध्या सूत लागलेलं असल्यामुळे अनेक रुग्णांवर पुरेसे उपचार होत नाहीत किंवा त्यांना उपचारांपासून दूर राहावं लागत आहे. उशिरा उपचारांचा फटका अनेक रुग्णांना बसतो आहे. 

‘युरोप कॅन्सर ऑर्गनायझेशन’च्या मते तर युरोपात कॅन्सर स्क्रिनिंगच्या तब्बल १० कोटी तपासण्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभावी होऊ शकल्या नाहीत. यासंदर्भात ब्रिटनचे आरोग्य अभ्यासक डॉ. मार्क लॉलर यांच्या म्हणतात, डॉक्टरांच्या कमतरतेचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर पुढची अनेक वर्षे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या क्षमतेच्या १३० टक्के काम करावं लागेल! युरोपीय युनियनच्या माहितीनुसार स्वीत्झर्लंडमध्ये सध्या आरोग्यावर सर्वाधिक खर्च केला जातो. तिथे एका व्यक्तीवर साधारणपणे सरासरी ७.७३ लाख रुपये खर्च केले जातात. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो नॉर्वे. तिथलं सरकार आरोग्यावर प्रति व्यक्ती सुमारे ६.४० लाख रुपये खर्च करतं. युरोपात यावर्षी दहापैकी चारजण नैराश्याचे शिकार झाले आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर उपचार होत नाहीत.

अख्खा जगात आरोग्याचे तीन-तेरा!
हे झालं युरोपचं, पण संपूर्ण जगातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सगळीकडेच आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत आणि तिथेही डॉक्टरांची कमतरता जाणवते आहे. जगाचा विचार करता तब्बल साडेचार कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सध्या तातडीनं गरज आहे.

Web Title: Patients on 'waiting' - from where to bring so many doctors?; worst conditions of health in the whole world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.