औरंगाबादच नव्हे देशातील अनेक भागात ‘सारी’ चे रुग्ण : ‘आयसीएमआर’चे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:08 PM2020-04-10T17:08:29+5:302020-04-10T17:19:15+5:30
कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल...
पुणे : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) ने देशभर केलेल्या अभ्यासात सिव्हीअर अॅक्युट रेस्पीरेटरी इलनेस म्हणजेच सारी हा आजार असलेल्या ५ हजार ९११ पैकी १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. राज्यातील 'सारी' च्या ५५३ रुग्णांची 'कोरोना'ची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल, असेही अभ्यासात म्हटले आहे.
‘सारी’ हा एक श्वसनाचा आजार आहे. तसेच कोरोनामध्ये ही अनेक रुग्णांना श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे 'आयसीएमआर'च्या शास्त्रज्ञांच्या टीमने दि. १५ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या सारीच्या रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली. त्यामध्ये ५ हजार ९११ रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी १.८ टक्के म्हणजे केवळ १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यामध्ये महाराष्ट्रासह २० राज्यातील ५२ जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश होता. गुजरात (७९२) व तामिळनाडू (५७७) पाठोपाठ महाराष्ट्रा (५५३) सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ३.८ टक्के म्हणजे २१ जण कोरोनाबाधित होते. हे रुग्ण केवळ औरंगाबाद नव्हे तर राज्यातील विविध आठ जिल्ह्यातील आहेत. हा अभ्यास करताना ह्यसारीह्णच्या रुग्णांची माहिती सरसकट संकलित केलेली नाही. त्यामुळे ह्यसारीह्णच्या सर्व रुग्णांची तपासणी केल्यास कोरोना बाधितांचा आकडा वाढू शकतो. तसेच त्यादृष्टीने या रुग्णांवर अधिक लक्ष दिल्यास कोरोनाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे साधन ठरू शकेल, असेही या अभ्यासात नमुद करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यांची नावे नमुद करण्यात आलेली नाहीत.
कोरोनाबाधित 'सारी' च्या रुग्णांमध्ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक ८३.३ टक्के आहे. तसेच एकुण १०४ पैकी ८३ जणांचे वय चाळिशीच्या पुढे आहे. त्यामध्ये ५० ते ७० या वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. एकुण बाधित रुग्णांपैकी ४० रुग्णांनी परदेश प्रवास केलेला नाही किंवा इतरांच्या संपर्कातही आलेले नाहीत. दोघांचा बाधित रुग्णाशी संपर्क आला होता. तर एका रुग्णाने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला आहे. तसेच ५९ रुग्णांची संसर्गाबाबतची कसलीही माहिती उपलब्ध झाली नाही. देशातील १५ राज्यांमधील कोरोनाबाधित 'सारी' रुग्णांचे प्रमाण १ टक्क्यांहून अधिक आहे. देशातील १५ राज्यातील ३६ जिल्ह्यांतील रुग्णांना थेट संसर्गाची कोणतीही पार्श्वभुमी नाही. या जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. सारी रुग्णांमधील सर्वेक्षण वाढविल्यास आरोग्य विभागाला प्राधान्यक्रम व नियोजन करण्यात अधिक मदत होईल, असेही स्पष्टपणे नमुद केले आहे.
-----------------
दि. २० मार्चनंतर सारीच्या रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यास सुरूवात झाली. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दि. २२ ते २८ मार्च या कालावधीत २८७७ पैकी ४८ जणांना तर दि. २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत २०६९ पैकी ५४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. दि. १५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत तपासण्यात आलेल्या ८५९ सारीच्या रुग्णांपैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असे अभ्यासातून समोर आले आहे.
------------------------
काही राज्यांतील कोरोनाबाधित 'सारी' रुग्णांची माहिती
राज्य सारी रुग्ण कोरोनाबाधित जिल्हे
गुजरात ७९२ १३ (१.६) ४
तामिळनाडू ५७७ ५ (०.९) ५
महाराष्ट्र ५५३ २१ (३.८) ८
केरळ ५०२ १ (०.२) १
कर्नाटक ३२० २ (०.६) २
उत्तर प्रदेश २९५ ४ (१.४) ५
दिल्ली २७७ १४ (५.१) ५
-------------------------------
आठवडानिहाय कोरोनाबाधित सारीचे रुग्ण
आठवडा सारी रुग्ण कोरोनाबाधित
दि. १५ ते २९ फेब्रुवारी २१७ ००
दि. १ ते १४ मार्च ६४२ ००
दि. १५ ते २१ मार्च १०६ २ (१.९)
दि. २२ ते २८ मार्च २८७७ ४८ (१.७)
दि. २९ मार्च ते २ एप्रिल २०६९ ५४ (२.६)
एकुण ५९११ १०४ (१.८)
-----------------