इडलीची किंमत वाढविण्यास कनवाळू ‘पाटीम्मा’चा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:46 AM2020-04-27T03:46:22+5:302020-04-27T06:57:01+5:30

एक रुपयाला विकत असलेल्या इडलीची किंमत वाढविण्यास सपशेल नकार दिला आहे. हा निर्णय त्यांनी सामाजिक जाणिवेतून घेतला आहे.

Patimma refuses to raise the price of Idli | इडलीची किंमत वाढविण्यास कनवाळू ‘पाटीम्मा’चा नकार

इडलीची किंमत वाढविण्यास कनवाळू ‘पाटीम्मा’चा नकार

Next

कोइम्बतूर : तमिळनाडूतील कमलातल या ८५ वर्षे वयाच्या व इडली पाट्टी किंवा पाटीम्मा (आजी) म्हणून प्रख्यात असलेल्या अन्नपूर्णेने लॉकडाऊनमुळे खूप नुकसान होऊनही, एक रुपयाला विकत असलेल्या इडलीची किंमत वाढविण्यास सपशेल नकार दिला आहे. हा निर्णय त्यांनी सामाजिक जाणिवेतून घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या चविष्ट इडली बनवून अनेकांना अत्यंत माफककिमतीत खाऊ घालत आहेत. पूर्वी त्या एक इडली फक्त २५ पैशाला विकत असत. त्यानंतर थोडी थोडी किंमत वाढवत त्यांनी एका इडलीला एक रुपया आकारायला सुरूवात केली. ही माफक किंमत गोरगरीब, स्थलांतरित मजूर यांना परवडतेही व त्यांचे पोटही भरते. त्यामुळे कमलातल यांचा त्यांना मोठा सहारा वाटतो. या लोकांना डोळ्यासमोर ठेवून कमलातल यांनी इडलीच्या किमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, धान्य आदींचा पुरवठा व्यवस्थित असला अनेक उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यावरही निर्बंध आहेत. या सगळ्याचा परिणाम कमलातल ऊर्फ पाटीम्माच्या इडली व्यवसायावरही झाला आहे. मात्र त्या अजिबात डगमगलेल्या नाहीत.
>स्टॅलिन यांनी केली विचारपूस
लॉकडाऊनमुळे व्यवसायात तोटा होत असूनही इडलीची किंमत वाढवायची नाही, हा कमलातल यांनी घेतलेला निर्णय कळताच द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी त्यांची शनिवारी विचारपूस केली. त्यांना लागेल ती मदत देण्याची तयारी दर्शविली. भारतियार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. कलिराज यांनी त्यांची भेट घेऊन धान्य व इतर वाणसामान दिले. कमलातल यांना मदत करण्यासाठी हिंदुस्थान स्काऊट आणि गाईडचे स्वयंसेवकही पुढे आले आहेत. कमलातल यांच्याविषयीचे वृत्त झळकताच सोशल मीडियातील असंख्य नेटकऱ्यांनीही त्यांना सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

Web Title: Patimma refuses to raise the price of Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.