JDUमधून हाकलल्यानंतर प्रशांत किशोर नितीश कुमारांना म्हणाले 'Thank You'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:03 PM2020-01-29T18:03:23+5:302020-01-29T19:36:38+5:30
जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
पाटणाः जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जेडीयूनं दोघांनाही पक्षाच्या सर्वच जबाबदारीतून मुक्त केलं. तसेच त्यांना जेडीयूमधूनही निलंबित केलं आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांना जेडीयूमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी नितीश कुमारांचेच आभार व्यक्त केले आहेत. नितीश कुमारांना प्रशांत किशोर यांनी 'Thank You' म्हटल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशांत किशोर यांना जेडीयूमधून निलंबित केल्यानंतर त्यांनी ट्विट केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी केली होती बंडखोरी
या ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी नीतीश कुमारांना शुभेच्छा दिल्या असून, धन्यवाद म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून पक्षाच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे बंडखोर म्हणून पाहिलं जात होतं.
Thank you @NitishKumar. My best wishes to you to retain the chair of Chief Minister of Bihar. God bless you.🙏🏼
— Prashant Kishor (@PrashantKishor) January 29, 2020
प्रशांत किशोर यांच्यावर नितीश कुमार नाराज
प्रशांत किशोर यांनी पक्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नितीश कुमारही नाराज होते. ज्यांना पक्षात प्रॉब्लेम आहे ते पक्ष सोडून जाऊ शकतात. पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याबाबत एवढी कठोर भूमिका घेतलेली होती. प्रशांत किशोरही शांत न राहता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. तुम्ही मला जेडीयूत कसे घेऊन आला, याबद्दल आता खोट्या कहाण्या ऐकवत आहेत. तुम्हाला जर अमित शाहांनी पाठवलेल्या माणसाचंच ऐकायचं असल्यास मी काय बोलणार, असंही ते म्हणाले आहेत.