लालू-राबडींच्या निवासस्थानी मारला गेला नाग, राजकारण सुरू; JDU नेत्यानं दिली अशी प्रतिक्रिया
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 7, 2020 04:08 PM2020-11-07T16:08:39+5:302020-11-07T16:10:19+5:30
राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी काळ्या रंगाचा साप निघाला होता. सुरक्षारक्षकांनी हा साप पाहिल्यानंतर, येथे एकच धावपळ उडाली होती.
पाटणा - बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी पाच फूट लंबा साप निघाला. हा साप पाहिल्यानंतर निवासस्थानी असलेल्या लोकांत धावपळ उडाली होती. या सापाला नंतर मारण्यातही आले. मात्र, आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. जेडीयू नेते अजय आलोक यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी काळ्या रंगाचा साप निघाला होता. सुरक्षारक्षकांनी हा साप पाहिल्यानंतर, येथे एकच धावपळ उडाली. नंतर या सापाला घेरून मारण्यात आले. साप मारल्याचे वृत्त बाहेर पसरताच, या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे.
यासंदर्भात बोलताना, जेडीयू नेते अजय आलोक म्हणाले, कार्तिक महिन्यात लोक भगवान शंकराची पूजा करतात. खुद्द लालू प्रसाद हेही भगवान शंकरांचे भक्त आहेत. असे असताना, भगवान शंकरांच्या गळ्यात असलेल्या नाग देवाची त्यांच्याच निवासस्थानी हत्या करण्यात आली.
ते म्हणाले, भगवान शंकरांनी लालू प्रसादांना स्वप्नात येऊन, बकरा खाऊ नको, असे सांगितले होते. यामुळेच त्यांनी बकरा खाने सोडले आहे. मात्र, आज या घटनेमुळे मन अत्यंत दुःखी आहे. यासंदर्भात वनविभागाला कळवले असते, तर आज त्या सापाचा जीव वाचू शकला असता.