झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:27 PM2019-09-23T13:27:39+5:302019-09-23T13:43:27+5:30
ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे.
पाटणा - अन्नपदार्थ ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अशा पद्धतीने पदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे. बिहारमधील पाटणा येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील एका तरुणाने झोमॅटोवरुन मागवलेली 100 रुपयांची ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात बँक खात्यातील तब्बल 77 हजार गमावले आहेत.
विष्णू हा इंजिनिअर असून त्याने झोमॅटो फू़ड डिलिव्हरी अॅपवरून पदार्थ ऑर्डर केला होता. डिलिव्हरी बॉय जेव्हा ऑर्डर घेऊन आला तेव्हा विष्णूला ऑर्डर केलेल्या पदार्थाचा दर्जा आवडला नाही. त्याने तो पदार्थ डिलिव्हरी बॉयला परत घेऊन जाण्यास सांगितलं. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने त्याला झोमॅटो कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करण्याचा सल्ला दिला. तसेच गुगलवर सर्च करून झोमॅटोचा कस्टमर केअर नंबर मिळवण्यास सांगितलं. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर ज्या सूचना मिळतील त्या फॉलो करा असं देखील डिलिव्हरी बॉयने त्याला सांगितलं.
विष्णूने गुगलवर सर्च करून जो पहिला नंबर दिसला त्यावर कॉल केला. त्यानंतर काही वेळाने त्याला एका नंबरवरून फोन आला. आपण झोमॅटो कस्टमर केअरकडून बोलत असल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितलं. तसेच 100 रुपयांची ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे रिफंड मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 रुपये जमा करावे लागतील असं विष्णूला सांगितलं. यासोबतच एक लिंक पाठवली. त्यावर क्लिक करून 10 रुपये जमा करा असं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.
विष्णूने 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात कोणताही विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले आणि 10 रुपये त्यात जमा केले. यानंतर काही मिनिटांत त्याच्या खात्यातून तब्बल 77 हजार रुपये गायब झाले आणि बँक खातं रिकामं झालं. पेटीएमच्या माध्यमातून हे पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. तेव्हापासून विष्णू पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांसह बँक आणि इतर ठिकाणी दाद मागत आहे. मात्र त्याला मदत मिळालेली नाही. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.