निवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:33 PM2018-10-16T18:33:42+5:302018-10-16T18:38:28+5:30
जनता दल युनायडेट(जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय चाणक्य समजले जाणा-या प्रशांत किशोर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
पाटणा- जनता दल युनायडेट(जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय चाणक्य समजले जाणा-या प्रशांत किशोर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं होतं आणि त्यांची थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याकडे नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून नितीश कुमारांचा भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच प्रशांत किशोरही जेडीयूमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांनी जेडीयूच्या नेत्यांना नितीशकुमारांच्या स्वच्छ प्रतिमेला प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही प्रशांत किशोर चर्चेत होते. प्रशांत यांच्या रणनीतीचा नितीश कुमारांना फायदा झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यापासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा एनडीएच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय.
निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील 'मास्टरी' सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखलीय. त्यामुळे 2012ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी 2014ची लोकसभा निवडणूक; प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं. अर्थात, काही निवडणुकांमध्ये हा राजकीय चाणक्य काहीसा अपयशीही ठरला, पण आता नव्या जोमाने तो जेडीयूच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाला आहे.
दुसरीकडे, प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संघटनेनं तरुणांची भरती सुरू केली आहे. #NationalAgendaForum हा हॅशटॅग प्रत्येक ट्विटसोबत जोडला जातोय. महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेऊन ते तरुणांना जोडण्याची मोहीम राबवत ठळकपणे जाणवतंय. त्यातून प्रशांत किशोर यांची चलाखी सहज लक्षात येऊ शकते. तसेच प्रशांत किशोर यांच्या या अभियानाचा जेडीयूला फायदा मिळू शकतो.