'अरे मी अजून जिवंत आहे'; स्वत:च्या मृत्यूची व्हायरल पोस्ट पाहून आमदारानेच सांगितलं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:02 PM2021-09-20T15:02:17+5:302021-09-20T15:08:50+5:30
MLA Musafir Paswan : एका आमदाराच्या मृत्यूची अफवा पसरल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी या पटकन जोरदार व्हायरल होतात. कित्येकदा काही घटना या खोट्या असल्याने किंवा अफवा असल्याने अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. एका आमदाराच्या मृत्यूची अफवा पसरल्याची घटना घडली आहे. बिहारमधील बोचहांचे विद्यमान आमदार मुसाफिर पासवान (MLA Musafir Paswan) यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर त्यांनीच सत्य सांगतलं आहे. 'अरे मी अजून जिवंत आहे' असा खुलासा त्यांना सोशल मीडियाद्वारे करावा लागला आहे.
मुसाफिर पासवान हे नेहमीच आजारी असतात. ते मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीचे आमदार आहेत. कधी कधी त्यांची प्रकृती अधिक खालावल्यावर ऑक्सिजन सपोर्टची देखील गरज भासते. याच दरम्यान रविवारी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांचं निधन झालं अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी ही परिसरात पसरली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या कुटुंबीयांना शोक संवेदनांचे फोन करायला सुरुवात केली.
लोकांनी त्यानंतर थेट मुसाफिर पासवान यांच्या वैयक्तीक फोनवर कॉल करायला सुरुवात केल्यानंतर पासवान यांना मोठा धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून अजून मी जिवंत आहे असं सांगितलं. तसेच मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पसरवणे थांबवा, असं आवाहन देखील केलं. पासवान आजारी असल्याने लोकांना देखील त्यांचा मृत्यू झाल्याचं खरं वाटलं.
मृत्यूच्या बातमी पसरल्याने सर्वांनाच धक्का
काही दिवसांपासून पासवान यांच्यावर पाटणा येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी मुकेश सहनी यांच्यासह चिराग पासवान यांनीही भेट दिली होती आणि त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थनाही केली होती. त्यानंतर ते बरे होऊन आपल्या घरी मुझफ्फरपूरला निघून गेले होते. त्यानंतर अचानक सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातमी पसरल्याने सर्वांनाच धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Corona Vaccine : धक्कादायक! एक, दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा लसीचा डोस, भाजपा नेत्याच्या सर्टिफिकेटवरून खळबळ#CoronavirusUpdates#Corona#coronavaccinehttps://t.co/2XEwlxVSvs
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021