अतिरेक्याच्या देशभक्त वडिलांचा देशाला अभिमान
By Admin | Published: March 10, 2017 06:32 AM2017-03-10T06:32:31+5:302017-03-10T06:32:31+5:30
जो देशाचा झाला नाही, तो माझा कसा होईल? भारताच्या सुरक्षिततेवर हल्ला चढवणारा माझा मुलगा असूच शकत नाही. अशा गद्दाराशी माझे नातेच नाही. सैफुल्लाला अल्लाही माफ करणार
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
जो देशाचा झाला नाही, तो माझा कसा होईल? भारताच्या सुरक्षिततेवर हल्ला चढवणारा माझा मुलगा असूच शकत नाही. अशा गद्दाराशी माझे नातेच नाही. सैफुल्लाला अल्लाही माफ करणार नाही. त्याच्या मृतदेहाचा चेहरा पाहण्याची आमची इच्छा नाही. त्याचा मृतदेह आम्हाला नको, असा निर्णय माझ्या कुटुंबाने घेतला आहे... हे उद्गार आहेत लखनौ येथे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईत मारला गेलेल्या दहशतवादी मोहम्मद सैफुल्लाचे वडील सरताज यांचे.
सैफुल्लाच्या वडिलांच्या वरील विधानांचा गृहमंत्री राजनाथसिंहांनी लोकसभेत गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, सैफुल्लाच्या पित्याच्या देशभक्तीचा संसदेलाच नव्हे, तर साऱ्या देशाला अभिमान वाटतो. लखनऊ चकमकीची चौकशी एनआयए करेल. मात्र तत्पूर्वी सैफुल्लाचे वडील व कुटुंबीय यांना सभागृहाची सहानुभूती आहे.
मध्य प्रदेशात रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला. १0 प्रवासी जखमी झाले असून, कोणीही चिंताजनक नाही.असे सांगून गृहमंत्री म्हणाले, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश पोलिसांतील समन्वयाुमळे मोठा संभाव्य घातपात टाळता आला. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवली आहे. आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. स्फोट घडवण्यासाठी आयईडी चा वापर केला गेला होता.
मध्य प्रदेशातून चार व उत्तर प्रदेशातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर सैफुल्लाची माहिती मिळाली. त्याआधारे तिथे दडून बसला होता त्या घराला वेढा घालण्यात आला. सैफुल्लाने आत्मसमर्पण करावे यासाठी प्रयत्न केल.े मात्र त्याने पोलिसांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यानंतरच्या कारवाईत सैफुल्ला मारला गेला.
सैफुल्लाचे पिता सरताज म्हणाले, मला तीन मुले असून सैफुल्ला हा सर्वात धाकटा. तो बीकॉम झाला आणि अकौंटन्सीचे काम शिकल्यानंतर हिशेबनीसाचे काम करीत होता. पण त्याचे कामात मन लागत नव्हते. सौदी अरबला जाण्याची त्याची इच्छा होती. माझा मुलगा देशाचा गद्दार निघाला. त्याच्या विचित्र उद्योगांविषयी मला जराशी जरी कल्पना असती, तर मी त्याला पोलिसांच्या हवाली केले असते. साऱ्या जगाने हा प्रकार पाहिला असता. सैफुल्लाच्या हातून चांगले कृ त्य घडले नाही, याचे मला तीव्र दु:ख आहे.
मुस्लिमांना लक्ष्य बनवून दहशतवादी कृत्यांशी जोडणाऱ्यांच्या तोंडावर सरताज यांच्या निवेदनाने चपराक दिली आहे. गृहमंत्र्यांनी सरताजचा गौरवपूर्ण उल्लेख केला, हे योग्यच झाले अशी प्रतिक्रिया संसदेत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली.