काशीपीठाच्या उत्तराधिकाऱ्यांचा पट्टाभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 07:24 AM2022-05-14T07:24:10+5:302022-05-14T07:24:19+5:30
डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य बनले डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी
वाराणसी : पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी हे आरुढ झाले आहेत. त्यांना या पीठाचे ८७ वे जगद्गुरु होण्याचा मान मिळाला आहे.
शुक्रवारी पहाटे ब्राम्ही मुहूर्तावर काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, श्रीशैल जगद्गुरु चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैनपीठांचे जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र यांनी त्यांना मंत्रोपदेश आणि विधी करून पट्टाभिषेक सोहळ्याद्वारे पीठाची जबाबदारी सोपविली. काशी पिठाच्या जंगमवाडी मठात असलेल्या परंपरेच्या ठिकाणी (गदगी) हा विधी पार पडला.
पट्टाभिषेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री हरिद्र लेपन (हळदी), दोरी घेणे, मस्तकाभिषेक हे विधी हजारो शिवाचार्य व भक्तांच्या उपस्थितीत झाले. हे विधी झाल्यानंतर उज्जैन पीठाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल पिठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे विद्यमान जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या मस्तकावर चरणकमल ठेवून मंत्रोपदेश दिला. त्यानंतर चांदीचे कमंडलू, पिवळी पताका असलेला पीठाचे प्रतीक दंड प्रधान करून एक किलो वजन असलेले सोन्याचे किरीट नूतन जगद्गुरूंच्या मस्तकावर ठेवून त्यांना जगद्गुरूंचे अधिकार देण्यात आले. सोहळ्यानंतर जंगमवाडी मठापासून ते दशाश्वमेध घाटापर्यंत अड्डपालखी काढण्यात आली. यावेळी हजारो शिवभक्तांसह लाखो भाविक आणि १०१ जलकुंभधारी सुवासिनींचा सहभाग होता.