शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:15 PM2023-05-31T13:15:04+5:302023-05-31T13:15:43+5:30
भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले.
नवी दिल्ली : भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. हृदयविकाराच्या झटक्याने ३० वर्षीय जवानाची प्राणज्योत मालवली. मूळचा हरयाणा येथील असलेला पवन कुमार राजस्थानमधील जैसलमेरमध्ये तैनात होता. शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या पवनचे पार्थिव मंगळवारी हरयाणा येथील त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. शासकीय इतमामात वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्याच्या आईसह कुटुंबीयांचा टाहो पाहून जमलेल्या गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.
'पवन कुमार अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता. आपल्या शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी 'खराळ' गावातील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच आजूबाजूच्या गावातील लोकही शहीद पवन कुमार याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. लक्षणीय बाब म्हणजे आपल्या तोंडचा घास गेल्याने पवन कुमारची आई हतबल झाली. पण तरीदेखील त्या माऊलीनं आपल्या शूर लेकाच्या मिशांना ताव देत त्याला सलाम ठोकला.
३० वर्षीय जवान शहीद
शहीद पवन कुमार याला लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. 'आम्हाला आमच्या मुलाच्या हौतात्म्याचा अभिमान' असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. पवन कुमारच्या आईने आपल्या शहीद मुलाच्या मिशांना ताव देत हौतात्म्याला सलाम ठोकला. लष्कराच्या वतीने नायब सुभेदार एलएन जीना यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या तुकडीने आणि हरयाणा पोलिसांच्या तुकडीने जवानाला सलामी देऊन अखेरचा निरोप दिला.