"गॅससाठी पैसे नाहीत, चुलीवर अन्न..."; IAS च्या आईचा Video शेअर करून सपाची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 01:09 PM2024-04-18T13:09:56+5:302024-04-18T13:11:20+5:30

पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याची आई सुमन म्हणाली की, घरात उज्ज्वला योजनेंतर्गत दिलेला सिलिंडर आहे, पण तो सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे चुलीवर अन्न शिजवावं लागतं.

pawan kumar crack upsc exam become ias mother poverty no gas cylinder samajwadi party slams bjp | "गॅससाठी पैसे नाहीत, चुलीवर अन्न..."; IAS च्या आईचा Video शेअर करून सपाची भाजपावर टीका

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या पवन कुमारला यूपीएससी परीक्षेत 239 वा रँक मिळाला आहे. पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याची आई सुमन म्हणाली की, घरात उज्ज्वला योजनेंतर्गत दिलेला सिलिंडर आहे, पण तो सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे चुलीवर अन्न शिजवावं लागतं. मुलगा पवनने कठीण परिस्थितीत हे स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामुळे समाजवादी पार्टीने आता भाजपावर निशाणा साधला आहे.

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पवन कुमारच्या आईचा व्हिडीओ शेअर करताना सपाने ट्विटरवर लिहिलं की, त्यांच्याकडे गॅससाठी पैसे नाहीत, त्यामुळे चूल पेटवावी लागते. हे भाजपा सरकारच्या 'न्यू इंडिया'चे वास्तव आहे. "मुलगा यूपीएससी पास झाला तेव्हा ही बाब समोर आली, नाहीतर कोण विचारायला जाणार होतं? भाजपा देशभर खोटं बोलत आहे. आता हे घोटाळेबाज सरकार नको. भाजपाला हटवा, देश वाचवा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

24 वर्षीय पवन कुमार तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 239 वा रँक मिळवून आयएएस झाला आहे, परंतु त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. वडील आणि बहिणींनी मजूर म्हणून काम केलं तेव्हाच त्यांच्या कोचिंग आणि पुस्तकांचा खर्च भागवू शकले आणि नंतर 3200 रुपये किमतीचा सेकंड हँड फोन विकत घेतला.

पवन कुमार हा बुलंदशहर जिल्ह्यातील रघुनाथपूर गावचा रहिवासी आहे. मुलाच्या यशावर त्याचे वडील मुकेश कुमार आणि आई सुमन खूप आनंदी आहेत. पवनचे कुटुंब राहत असलेल्या घरात वीज जोडणी आहे, मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठ्याची कमतरता आहे. घरात दुसरी कोणतीही सोय नाही. छप्पर देखील ताडपत्री आणि पॉलिथिनचे बनलेले आहे.

UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पवनची आई आणि बहीण जंगलातून लाकडे गोळा करतात आणि चुलीवर अन्न शिजवतात. कारण, उज्ज्वला योजनेंतर्गत या कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळाला होता, पण नंतर ते भरण्यासाठी एक हजार रुपयेही जमू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे. यावरून सपाने भाजपावर निशाणा साधला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेल्या सिलिंडरमध्ये गॅस न भरल्याबद्दल सपाने भाजपावर ताशेरे ओढले आहेत. 
 

Web Title: pawan kumar crack upsc exam become ias mother poverty no gas cylinder samajwadi party slams bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.