शेतकरी प्रश्नांबाबत पवारांची जेटलींशी चर्चा
By admin | Published: August 23, 2016 06:19 AM2016-08-23T06:19:45+5:302016-08-23T06:19:45+5:30
पवार यांनी सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या, इथेनॉलच्या तसेच साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या, इथेनॉलच्या तसेच साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. अरुण जेटली यांनी हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, साखर कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार डिस्टिलरीज सुरू केल्या. पण नंतर केंद्राने त्यासाठीची सवलत मागे घेतली असून, त्यामुळे पेट्रोल कंपन्यांना सवलत मिळत असून, कारखान्यांवर मात्र त्याचा भार पडत आहे. कारखान्यांचे हे नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचेच आहे. हा प्रश्न लक्षात येताच जेटली यांनी लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले.
पीक कर्ज नाबार्डच्या वतीने जिल्हा बँकांना दिले जाते. गेली दोन वर्षे ५ टक्के कमी कर्ज दिले गेल्याने जिल्हा बँकांची अडचण झाली आहे. त्यामुळे कमी कर्जाच्या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, असे अर्थमंत्र्यांच्या कानावर घातले आहे. तसेच साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अर्शंी मागणीही जेटली यांच्याकडे केली आहे. या तिन्ही मागण्यांवर अर्थमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.