पवारांना ‘मध्यावधी’ची दिवास्वप्ने
By admin | Published: June 8, 2017 12:19 AM2017-06-08T00:19:19+5:302017-06-08T00:19:19+5:30
महाराष्ट्राची वाटचाल मध्यावधी निवडणुकीकडे होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत भाजपला मान्य नाही
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्राची वाटचाल मध्यावधी निवडणुकीकडे होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत भाजपला मान्य नाही. ‘‘पवार साहेबांना दिवसा स्वप्न पडत आहेत. त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात भूमिका बजावता येईल का हे पाहतोय. शिवसेना भाजपचा हात सोडून देईल व आपल्या पक्षाला राजकीय भूमिका मिळेल, असा त्यांचा विचार आहे. परंतु यापैकी काहीही घडणार नाही,’’ असे भाजपच्या वरिष्ठ सरचिटणीसाने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला अतिशय योग्यरित्या हाताळत आहेत. जर त्यांनी आॅक्टोबरमध्ये पॅकेज घोषित करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावेळी मान्सून जवळपास संपलेला असतो हे विचारात घेऊन. शेतकऱ्यांचे जे तातडीचे प्रश्न आहेत ते सुटतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मान्सूननंतर योग्य मूल्यमापन होईल, असेही हा नेता म्हणाला.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास यंत्रणांकडून सतत पाठपुरावा होत असल्यामुळे शरद पवार काळजीत पडले आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आधीच अजित पवारांची चौकशी केली असून संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या कारकिर्दीतील विमान खरेदीसंदर्भात केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे, असे हा नेता म्हणाला.
>राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सेनेची साथ
शिवसेनेशी सलोख्याचे संबंध असल्याचे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या छोट्या गटाशी बोलताना सांगितले होते. राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना मत देईल, याची भाजपाच्या नेतृत्वाला खात्री आहे.
याआधी राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेने भाजपाच्या उमेदवाराला मत दिले नव्हते, हे येथे नमूद करायला हवे; परंतु मोदी-अमित शाह यांच्या टीमला शिवसेना भाजपाच्या उमेदवाराला मत देईल, याची खात्री आहे.