शाळेच्या थकीत फीपैकी ५०% तीन आठवड्यांत भरा; गैरफायदा घेणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:12 AM2021-08-08T06:12:48+5:302021-08-08T06:13:01+5:30
थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
कोलकाता : शाळेच्या थकीत फीच्या ५० टक्के रक्कम पालकांनी तीन आठवड्यांच्या आत भरावी असा महत्वपूर्ण आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. जे पालक फी भरणार नाहीत, त्यांच्या मुलांना गुणपत्रिका देऊ नका असेही न्यायालयाने बजावले आहे.
कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे अनेक पालकांना शाळेची पूर्ण फी भरणे शक्य झाले नव्हते. पण त्यामुळे शाळांचीही आर्थिक कोंडी झाली होती. जे विद्यार्थी दहावी, बारावीला होते, त्यांच्यापैकी ज्यांच्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका देऊ नका असा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, २०२० सालापेक्षा आता आर्थिक स्थिती सुधारली आहे. मात्र या स्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची संपूर्ण फी भरलेलीच नाही. अशा थकित फीची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना साथीमुळे पगाराविनाच राहावे लागले अशी स्थिती उद्भवली नाही. शाळेच्या फीमध्ये सवलत द्यावी किंवा फी कमी करावी अशा मागणीसाठी न्यायालयात पालकांनी याचिका दाखल केली होती.
फी भरणे मुद्दाम टाळले
कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, अनेक पालकांची शाळेची फी भरण्याची आर्थिक क्षमता आहे. पण त्यांनी मुद्दामहून हे पैसे भरणे टाळले आहे. शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना पगार देण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. शाळेच्या वास्तूच्या देखभालीचा खर्चही आहेच. विद्यार्थी व शाळा या दोघांच्या हिताचे संतुलन राखणे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी थकीत फी भरलीच पाहिजे.