तपासात लक्ष घाला; सुशांतसिंहच्या बहिणीचे पंतप्रधान मोदी यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:46 PM2020-08-01T23:46:41+5:302020-08-01T23:46:53+5:30
श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले पत्र । न्यायव्यवस्थेवर व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात तातडीने लक्ष घाला, अशी विनंती सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करून ही मागणी केली आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही तिने नमूद केले आहे.
बॉलिवूडचा उगवता स्टार असलेल्या सुशांतसिंग याचा १४ जून रोजी मुंबईत रहस्यमरीत्या मृत्यू झाला होता. त्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. सुशांतसिंहचे वडील के.के. सिंग यांनी अलीकडेच पाटणा येथे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी तिच्यावर ठेवला आहे.
‘मी सुशांतसिंह राजपूतची बहीण आहे. मी आपणास विनंती करते की, या संपूर्ण प्रकरणात तातडीने लक्ष घालून तपास करण्यात यावा. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळायलाच हवा, अशी आमची अपेक्षा आहे’, असे श्वेतासिंग कीर्ती हिने इन्स्टाग्रावरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांना उद्देशून लिहिले आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयास टॅग केले आहे.
श्वेतासिंग कीर्ती हिने आपल्या पत्रवजा पोस्टमध्ये पंतप्रधानांना उद्देशून लिहिले की, ‘प्रिय सर, माझे हृदय मला सांगतेय की, तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहाल. आम्ही एका साध्या कुटुंबातील लोक आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता, तेव्हा त्याला कोणी गॉडफादर नव्हता, आताही आमच्या बाजूने कोणी नाही. माझी आपणास विनंती की, आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. पुराव्यात हेराफेरी होणार नाही, याची सुनिश्चितता करावी.’
बिहार पोलिसांकडून तपास सुरू
सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काही लोक करीत आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते की, ‘मुंबई पोलिसांच्या तपासाविषयक कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न दु:खदायक आहे.’ सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, बिहार पोलिसांचे एक पथक सध्या मुंबईत आलेले आहे.