स्मार्ट फोनद्वारे झटपट करा रक्कम अदा
By admin | Published: October 13, 2016 05:13 AM2016-10-13T05:13:59+5:302016-10-13T05:14:36+5:30
भारतात कोणालाही रक्कम अदा करण्यासाठी आता रोखीचे व्यवहार, धनादेश, बँक ड्राफ्टस इत्यादी विनिमय साधनांचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
भारतात कोणालाही रक्कम अदा करण्यासाठी आता रोखीचे व्यवहार, धनादेश, बँक ड्राफ्टस इत्यादी विनिमय साधनांचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही. लवकरच त्यांची जागा यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ही नवी विनिमय
पद्धत घेणार आहे. यूपीआय ही आपल्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्याची अशी पेमेंट सेवा आहे की, ज्याच्या खात्यात रक्कम अदा करायची आहे, त्याच्या
बँक खात्याचा क्रमांक देण्याची गरज नाही.
आपल्या स्मार्ट फोनद्वारे त्याच्या कोणत्याही बँकेच्या खात्यात त्याचा व्हर्च्युअल अॅड्रेस, ई-मेल अथवा बँकेत रजिस्टर केलेला त्याचा मोबाइल क्रमांक दिल्यास रक्कम जमा करता येईल. यूपीआयमुळे कोणालाही रक्कम अदा करणे यापुढे अधिक सोपे होणार आहे.
भारतात यंदा आॅगस्ट महिन्यात ही सेवा सुरू झाली. आता यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) सेवेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने अधिक गती देण्याची तयारी चालवली असून, मार्च २0१७ पर्यंत देशातल्या किमान ५0 बँका यूपीआय सेवा सुरू करणार आहेत. यूपीआय हा आर्थिक विनिमयाचा असा आधुनिक प्रयोग आहे, जो पेमेंट रीसिट तत्त्वावर काम करतो. आपल्या स्मार्ट फोनद्वारे या माध्यमाचा वापर करून कोणालाही रक्कम अदा करता येईल अथवा मिळवता येईल. या सेवेचा लाभ घेणारा ग्राहक ज्याला रक्कम
अदा करायची आहे त्याच्या व्हर्च्युअल अॅड्रेसच्या नावाऐवजी त्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर अथवा ई मेलचा वापर करू शकेल. उदाहणार्थ 1234567890@२ु्र या व्हर्चुअल अॅड्रेसवर पैसे पाठवणे अथवा पैसे मिळवणे या क्रियेसाठी हा पत्ता पेमेंट आयडेंटिफायर म्हणून काम करील.
स्मार्ट फोनच्या केवळ दोन सिंगल क्लिकवर फॅक्टर आॅथेंटिकेशनद्वारे रक्कम अदा करण्याची अथवा रक्कम मिळवण्याची क्रिया यूपीआय माध्यमातून पूर्ण होईल. यूपीएतून एकाच वेळी अनेक बँकांचे अकाउंट्स हँडल करता येतील. पेमेंट करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या खाते क्रमांकाची आवश्यकता नाही, तर त्याचा रजिस्टर मोबाइल नंबर अथवा बँकेच्या व्यवहाराशी संलग्न त्याचा ई-मेल पत्ता यापैकी कोणतीही एक माहिती त्याच्या खात्यात पैसे लगेच म्हणजे रीअल टाइममधे वर्ग करण्यास पुरेशी ठरेल. २४ तास ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने बँकांच्या सुट्ट्यांचा आर्थिक व्यवहाराशी संबंध राहणार नाही.