कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही, मेहबूबा मुफ्तींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 10:39 PM2023-05-21T22:39:20+5:302023-05-21T22:40:13+5:30
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु कलम 370 रद्द केल्याने राज्याचे विभाजन झाले आणि ते अकार्यक्षम झाले, असेही त्या म्हणाल्या.
बंगळुरू: पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मोठी घोषणा केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. तसेच, आपला पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु कलम 370 रद्द केल्याने राज्याचे विभाजन झाले आणि ते अकार्यक्षम झाले, असेही त्या म्हणाल्या.
कर्नाटकातील नव्या काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेहबूबा मुफ्ती शनिवारी बंगळुरू येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी बंगळुरूमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, दिल्लीत जे काही घडले ते सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपला कोणताही विरोधक नको आहे. दिल्ली सरकार हतबल झाले आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. जम्मू-काश्मीर आता खुले कारागृह बनले आहे. आमचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
मी ज्या कुटुंबातून मुख्यमंत्री होते, त्या कुटुंबात असे घडू शकते, तर ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे कलम 370 पुन्हा बहाल होईपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण माझा पक्ष निवडणूक लढवेल. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्यवादाचे उत्तम उदाहरण आहे. पण कलम 370 रद्द करून सरकारने ते कमकुवत केले. चीन आता जम्मू-काश्मीरच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत आहे. यापूर्वी हे काम केवळ पाकिस्तान करत होता, असे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.
याचबरोबर, आमच्या राज्यात सर्वात जास्त लष्कर तैनात आहे. तिथे सुरक्षेच्या नावाखाली दररोज छळ व अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. जम्मूमध्ये G-20 शिखर परिषद होणार आहे. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पण भाजपने तो हायजॅक केला. त्यांनी लोगोचे रुपांतर कमळात केले. जी-20 चा लोगो एखाद्या पक्षाशी नव्हे तर देशाशी संबंधित असणे गरजेचे होते. सार्कच या प्रदेशात आपल्या देशाचे नेतृत्व प्रस्थापित करेल. आमचे प्रश्न सुटण्यासाठी सार्क परिषद येथेही झाली पाहिजे, असेही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.