"... म्हणून जामा मशीद बंद करण्यात आली", मेहबुबा मुफ्ती यांची प्रशासनावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 01:11 PM2024-04-07T13:11:29+5:302024-04-07T13:33:06+5:30
Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासनावर टीका केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक जामा मशीद नुकतीच प्रशासनाने बंद केली आहे. तसेच, ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीर वाइज उमर फारुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासनावर टीका केली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, "शब-ए-कद्रच्या निमित्ताने लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी जामा मशीद बंद करण्यात आली आणि मीर वाइज यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले, हे किती दुर्दैवी आहे. जमीन, संसाधने, धर्म... तुम्ही काश्मिरींना कशापासून वंचित ठेवणार? "
दरम्यान, रमजान महिन्यातील शब-ए-कद्र निमित्त शनिवारी सायंकाळी हजरतबल दर्गा येथे मोठ्या संख्येने जमा झाले आणि नमाज अदा केली. श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यात मोठ्या संख्येने लोकांनी शुक्रवारची नमाज अदा केली. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात हा एक प्रसिद्ध दर्गा आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी हजरतबल दर्गा येथे शुक्रवारची नमाज अदा केली.
यापूर्वी ३ मार्च रोजी इंडिया आघाडीला धक्का देत मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, त्यांचा पक्ष पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये एकट्याने निवडणूक लढवेल. पीडीपी काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. त्याचबरोबर, जम्मूतील दोन लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांच्या विधानानंतर मेहबूबा यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमधील तीनही जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. नॅशनल कॉन्फरन्सने अनंतनाग-राजौरी जागेसाठी आपला उमेदवार मियां अल्ताफ यांची घोषणा करून लोकसभा निवडणुकीसाठी पीडीपीबरोबर काश्मीरमध्ये जागावाटपाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.