Jammu & Kashmir: पीडीपीच्या खासदाराने फाडली राज्यघटना; तर एका सदस्याने स्वत:चा कुडता फाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:18 AM2019-08-06T04:18:18+5:302019-08-06T04:20:08+5:30
खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे अभद्र कृत्य केले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) एक खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे अभद्र कृत्य मंगळवारी केले; तर याच पक्षाचे एक खासदार मीर मोहम्मद फयाझ यांनी निषेध म्हणून स्वत:चा कुडता फाडून घेतला.
हा प्रस्ताव राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, पीडीपी, भाकप, माकप, राजद, आप या पक्षांच्या खासदारांनी सभापतींच्या हौद्यामध्ये जमा होऊन धरणे धरले; तसेच मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. हा निषेध सुरू असताना पीडीपीचे खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे कृत्य केल्याने सभागृह अवाक् झाले. भाजपचे खासदार विजय गोयल यांनी तत्काळ हौद्यामध्ये जाऊन लवाय यांच्या हातातून राज्यघटनेची प्रत काढून घेण्याचा प्रयत्न केला. लवाय यांना वाचविण्यासाठी काँग्रेसचे खासदार बी. के. हरिप्रसाद हेदेखील हौद्यामध्ये गेले.
मार्शलद्वारे सभागृहाबाहेर काढले
प्रस्तावाचा विचित्र पद्धतीने निषेध करणाऱ्या पीडीपीच्या दोन्ही खासदारांना सभापती व्यंकय्या नायडू यांच्या आदेशानुसार मार्शलनी तत्काळ सभागृहाबाहेर काढले.
राज्यघटना फाडण्याचे गैरकृत्य मी कोणालाही करू देणार नाही. तसे करणाºयावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नायडू यांनी दिला आहे.
सभागृहातून बाहेर काढण्यात आल्यानंतर लवाय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव हा काश्मीरची स्वतंत्र ओळख पुसून टाकण्याचा डाव आहे. त्याबद्दल मोदी सरकारचा पीडीपी तीव्र निषेध करते.