पीडीपी अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची सुटका; १४ महिन्यांपासून होत्या स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 02:57 AM2020-10-14T02:57:18+5:302020-10-14T06:49:22+5:30
त्यांना मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी सीआरपीसीच्या कलम १०७ आणि १५१ तहत ताब्यात घेण्यात आले होते.
श्रीनगर : चौदा महिन्यांपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या जम्मू_-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. मागच्या वर्षी केंद्र सरकारने विशेष राज्याचा दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या निर्णय घेण्याच्या आदल्या दिवशी अन्य नेत्यांसह मेहबूबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आले होते.
केंद्रशासित जम्मू-काश्मीर प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षा कायद्यातहतचे आरोप रद्द केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या स्थानबद्धतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेण्याच्या दोन दिवसांआधीच ही घडामोड झाली. तत्पूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी मेहबूबा मुफ्ती यांची सुटका करण्यात येत असल्याचे टष्ट्वीट केले होते.
त्यांना मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी सीआरपीसीच्या कलम १०७ आणि १५१ तहत ताब्यात घेण्यात आले होते. नंतर ६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुरक्षा कायद्यातहत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला त्यांना चेश्मा शाही अतिथीगृहात ठेवण्यात आले. तेथून अन्य शासकीय विश्रामगृहात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांचे घर उपतुरुंग घोषित करुन ७ एप्रिल रोजी त्यांना घरात हलविण्यात आले होते. त्यांची कन्या इल्तिजा यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या स्थानबद्धतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर २९ सप्टेंबर रोजी शेवटची सुनावणी झाली.