शांती आणि विकासासाठी सहकार्य गरजेचं, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचं शांततेसाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 10:40 AM2017-09-04T10:40:03+5:302017-09-04T10:59:25+5:30

मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत. 

Peace and development need cooperation; PM urges peace in the BRICS summit | शांती आणि विकासासाठी सहकार्य गरजेचं, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचं शांततेसाठी आवाहन

शांती आणि विकासासाठी सहकार्य गरजेचं, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचं शांततेसाठी आवाहन

Next

बीजिंग, दि. 4 - ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे. 'शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत. 



दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे.आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन केलं. 



मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 
- विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.
- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.
- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.
-  आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. 
- भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे. 


चीनमधील शियामेन शहरात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, एकत्रितपणे शांती आणि विकासाचं ध्येय साध्य केलं जाऊ शकतं असं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. सोमवारी संध्याकाळी होणा-या संयुक्त निवेदनात मोदी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील असं बोललं जात आहे. चीनने मात्र याआधीच मोदींनी असं करु नये असा इशारा दिला आहे. 

पाकिस्तानशी संबधित दहशतवादाचा मुद्दा चर्चेला आल्यास आपला आक्षेप असेल असं चीनने आधीच स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं बोलले होते. यामुळे चीनला पुन्हा एकदा मोदी हा उल्लेख करतील अशी चिंता आहे. 


'पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा आला की, भारत नेहमीच आपली चिंता व्यक्त करताना दिसतो. ब्रिक्स परिषदेत चर्चा करण्यासाठी हा योग्य विषय आहे असं मला वाटत नाही', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग बोलल्या होत्या. हा विषय चर्चेला आला तर चीनी नेते आपला मित्रराष्ट्र पाकिस्तानची बाजू घेतील, ज्याचा परिणाम ब्रिक्स परिषदेवर होईल असंही हुआ चुनयिंग यांनी सांगितलं होतं. 

'ब्रिक्स परिषदेकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. परिषद यशस्वी व्हावी याकरिता संबंधित पक्ष मदत करतील अशी अपेक्षा आहे', असंही हुआ चुनयिंग बोलल्या होत्या. ब्रिक्समधील पाचही देशांना त्याचं हे आवाहन होतं, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. 
 

Web Title: Peace and development need cooperation; PM urges peace in the BRICS summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.