विकासासाठी शांतता, सलोखा आवश्यक, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:20 AM2020-03-04T04:20:54+5:302020-03-04T07:37:16+5:30
देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी अपरोक्षपणे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, स्वातंत्र्य आंदोलनात ‘वंदे मातरम’बद्दल आक्षेप घेण्यात आला होता, त्याचप्रमाणे ‘भारत माता की जय’ या जयघोषावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही लोकांना ‘भारत माता की जय’ बोलण्यास लाज वाटते, असे पंतप्रधान मोदी भाजप खासदारांच्या बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील दंगलीनंतर पक्षाच्या बैठकीत आपल्या पहिल्या भाषणात मोदी म्हणाले की, भाजपसाठी राष्टÑहित सर्वोच्च आहे, तर इतरांसाठी पक्षहित सर्वांत महत्त्वाचे आहे, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
विकास हा आमचा मंत्र आहे आणि शांतता, सलोखा आणि एकता देशाच्या विकासाठी पूर्वावश्यक आहे. शांतता, सलोखा आणि एकतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर भर देताना पंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना मन, वाचा आणि कृतीने देशाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. भारत माता की जय हा जयघोष मनात ठेवून त्यांनी देशाच्या विकासासाठी काम केले पाहिजे. कारण देशाचा विकास सर्वोच्च आहे, असेही ते म्हणल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या काही नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे दिल्लीत दंगल भडकली, असा आरोप विरोधी पक्ष करीत असताना पंतप्रधानांनी शांतता, सलोखा आणि एकतेचे आवाहन केले. बैठकीत मोदी यांनी जनऔषधी केंद्राच्या फायद्यांचाही ठकळपणे उल्लेख करीत या लाभार्थ्यांशी ७ मार्च रोजी संवाद करणार असल्याचे सांगितले.