काश्मिरात शांतता
By admin | Published: July 20, 2016 05:23 AM2016-07-20T05:23:43+5:302016-07-20T05:23:43+5:30
काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली.
श्रीनगर : काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली. दुसरीकडे काजीगुंड घटनेबाबत लष्कराने तीव्र खेद व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले आहेत. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी चकमकीत ठार झाल्यापासून खोऱ्यात हिंसाचार सुरू असून यात आतापर्यंत ४२ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, राज्यात संचारबंदी सुरूच आहे.
काजीगुंड येथे निदर्शकांनी सोमवारी लष्करी वाहनावर दगडफेक केली. तेव्हा सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन ठार तर निलोफर नावाच्या महिलेसह सहा जण जखमी झाले होते. उपचार सुरू असताना आज निलोफर यांचा मृत्यू झाला. लष्कराचे गस्ती पथक देवसरकडे जात होते. तेव्हा चुराहट काजीगुंड येथे लोकांनी रस्त्यावर अडथळे उभे केल्याचे पथकाला आढळून आले. जवान अडथळे हटवीत असताना काही समाजकंटकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू केली.
वृत्तपत्र प्रकाशकांनी आज सलग पाचव्या दिवशी वृत्तपत्रे प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. पीडीपी-भाजप सरकारने प्रसिद्धी माध्यमांवर निर्बंध लादले. तथापि, त्याची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नाहीत तसेच हे दोन्ही पक्ष एकसुरात बोलत नसल्याच्या निषेधार्थ प्रकाशकांनी वृत्तपत्रे प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला.
>अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा येथील तळ छावणीहून मंगळवारी सायंकाळी पुन्हा सुरू झाली. परिस्थितीचा आढावा घेऊन यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी काश्मीर खोऱ्यातील दोन तळ छावण्यांहून २५९१ भाविकांचा जथा ६० वाहनांतून पवित्र गुंफेकडे रवाना झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.