शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:46 AM2018-02-08T04:46:03+5:302018-02-08T04:46:11+5:30
सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत.
श्रवणबेळगोळ (जि. हासन) : सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. गोमटेश्वर बाहुबली भगवंतांनी सर्व त्याग करून तपश्चर्येचा, त्यागाचा मार्ग अवलंबला. संघर्षाने शांती मिळत नाही हे भगवान बाहुबली यांनी राजत्यागातून सांगितले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बुधवारी (दि. ७) गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पंचकल्याण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महामस्तकाभिषेक समितीचे अध्यक्ष, कृषिमंत्री ए. मंजू, धर्मस्थळाचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.
श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेकसाठी आल्यानंतर एक प्रेरित शक्ती मिळाली. चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्य यांनी सल्लेखना घेतली व आपल्या तपश्चर्येतून जीवन त्याग केला. आजचा महोत्सव हा जैन धर्मीयांचा कुंभमेळा आहे ,असे राष्ट्रपती कोविंद यांनी त्यागींचा, आर्यिकांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. जिनेन्द्र भगवंतांचे पूजनही केले. राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले, सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांताचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करावे. त्यातूनच खरा सिद्धांत आपल्या जीवनात येईल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भगवान बाहुबली यांनी दिलेला अहिंसेचा संदेश येथून सर्वांनी घेऊन जावा आणि तो अंगीकारावा, असे आवाहन केले.
आचार्य वर्धमानसागर यांनी ‘तं गोमटेशं पणमानी णिच्चं’ या प्राकृत भाषेतील वचनाचा दाखल देत सांगितले की, महोत्सवाचे साक्षीदार होण्याचा खूप आनंद होतोय. राज साम्राज्याचा त्याग करून भगवान बाहुबली यांनी दीक्षा घेतली आणि ध्यान साधनेतून मोक्ष प्राप्त केला. या त्यागाच्या संदेशाची आज समाजाला गरज आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, वीर सेवा दल, पदाधिकारी, प्रतिनिधी, श्रावक-श्राविका उपस्थित होते.
>उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींना
स्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक स्वामी म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या महोत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे. महामस्तकाभिषेक उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनाच आहे. १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, २००६ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि यंदाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.