देशभरातील डॉक्टर काढणार शांतता यात्रा, २५ हजार डॉक्टर व विद्यार्थी येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 12:45 IST2020-01-18T12:41:14+5:302020-01-18T12:45:51+5:30
आयएमएच्या राज्यातील २१० शाखांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले व सरकारकडून होणारा अन्याय याबाबत विचारमंथन

देशभरातील डॉक्टर काढणार शांतता यात्रा, २५ हजार डॉक्टर व विद्यार्थी येणार
पुणे : डॉक्टरांवर होणाºया हल्ल्याविरोधात केंद्रीय पातळीवर कायदा करावा, नॅशनल मेडिकल कमिशनमधील काही तरतुदी वगळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील डॉक्टर दि.१२ मार्च साबरमती आश्रमापासून शांतता यात्रा काढणार आहेत. या शांततामय आंदोलनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेले सुमारे २५ हजार डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
आयएमएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. या आंदोलनामध्ये आयएमए महाराष्ट्रचे सदस्यही सहभागी होणार आहे. त्यानिमित्त ११ मार्चपर्यंत राज्यभर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आयएमएच्या राज्यातील २१० शाखांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले व सरकारकडून होणारा अन्याय याबाबत विचारमंथन केले जाणार आहे. सर्वपक्षीय राजकीय नेते, खासदार, आमदार, मंत्री यांनाही मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती
आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली.
डॉक्टर व रुग्णालयांवर होणाºया हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ‘दि हेल्थ केअर सर्व्हिस पर्सन्स अॅन्ड हेल्थ केअर सर्व्हिस इन्स्टिट्युशन्स (प्रिव्हेन्शन आॅफ व्हायोलन्स अॅन्ड डॅमेज टु प्रॉपर्टी बिल २०१९)’ हे विधेयक डिसेंबर महिन्यात संसदेत सादर केले जाणार होते; पण गृह खात्याने अचानक मागे घेतले. देशातील २२ राज्यांमध्ये हा कायदा आहे; पण केंद्र सरकार काणाडोळा करत असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन या कायद्यामध्ये दुर्गम भागात वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींना जुजबी प्रशिक्षण देऊन दुय्यम आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी बनवण्याची योजना भोंदू डॉक्टर निर्माण करणारी आहे. कलम १५ नुसार सर्व
आधुनिक वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘एक्झिट’ ही परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पदव्युतर शिक्षण घेता येईल किंवा वैद्यकीय व्यवसाय सुरू करता येणार आहे. याविरोधात आयएमएकडून आंदोलन केले जाणार आहे.