चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, हजारो रुपये वसूल केले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:54 IST2025-03-17T21:54:08+5:302025-03-17T21:54:51+5:30

Cyber Crime News: ऑनलाइन, फोन कॉल करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं प्रमाण मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अशी फसवणूक करणाऱ्या डिजिटल चोरालाच एका तरुणाने चातुर्याचा वापर करून गंडवल्याची घटना समोर आली आहे.

Peacock on the thief! The young man cheated the person who tried to cheat him online, recovered thousands of rupees | चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, हजारो रुपये वसूल केले   

चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, हजारो रुपये वसूल केले   

ऑनलाइन, फोन कॉल करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं प्रमाण मागच्या काही काळापासून  मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे गुन्हेगार वेगवेगळे हातखंडे वापरून लोकांना गंडा घालत असतात. मात्र अशी फसवणूक करणाऱ्या डिजिटल चोरालाच एका तरुणाने चातुर्याचा वापर करून गंडवल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील ही घटना आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार  ६ मार्च रोजी भूपेंद्र सिंह हा आपल्या दैनंदिन कामांमध्ये  गुंतला असताना त्याळा एक फोन आला. तसेच त्यांनी फोन उचलला असता समोरून मी सीबीआय अधिकारी बोलत आहे, असा धीरगंभीर आवाज आला. हा काहीतरी सायबर फसवणुकीचा प्रकार असू शकतो, अशी शंका भूपेंद्र याला आली. तेवढ्यात समोरून बोलत असलेल्या कथित सीबीआय अधिकाऱ्याने तुमचे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे असून, तुमच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे, असे सांगितले.

भूपेंद्र याच्याकडे सुरुवातीला १६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच त्याला एफआयआरची एक कॉपीही पाठवण्यात आली. समोरून बोलत असलेल्या कथित अधिकाऱ्याला भूपेंद्र हा आपल्या जाळ्यात फसला असे वाटले. मात्र हा ठकसेन स्वत:च जाळ्यात अडकला. भूपेंद्रने उलट त्यालाच जाळ्यात अडकवण्याची योजना आखली. भूपेंद्रने त्याच्याकडे एक दिवसाचा वेळ मागितला. तसेच मी विद्यार्थी असून, घरातून चोरलेली सोन्याची चेन गहाण ठेवून पैसे जमवावे लागतील, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कथित सीबीआय  अधिकारी असलेल्या या सायबर गुन्हेगाराने त्याला पुन्हा फोन केला. तेव्हा, भूपेंद्रने चेन सोडवून घेण्यासाठी तीन हजार रुपयांची उलट मागणी या सायबर गुन्हेगाराकडे केली. तसेच त्यानेही भूपेंद्रला पैसे दिले.

त्यानंतर भूपेंद्रने या सायबर गुन्हेगाराला आणखी फसवण्यासाठी नवा डाव आखला. सोनाराने मला अल्पवयीन समजून आई वडिलांस बोलवण्यास सांगितले आहे, असे या सायबर चोरट्यास सांगितले. तसेच माझे वडील म्हणून तूच सोनाराशी  बोल अशी गळ घातली. त्या बोलण्यामध्ये हा सायबर चोर एवढा फसला की त्याने आणखी ४ हजार ५०० रुपये पाठवले.

त्यानंतर या सायबर चोरट्याने १० मार्च रोजी भूपेंद्रला पुन्हा फोन केला. तसेच आपले पैसे परत देण्याची मागणी केली. तेव्हा भूपेंद्रने त्याला आणखी गंडा घालण्याची योजना आखली. तसेच चेन गहाण ठेवल्यास १ लाख १० हजार रुपये मिळू शकतात. मात्र त्यासाठी ३ हजार रुपये लागतील असे सांगितले. तेव्हा या सायबर ठकाने विश्वास ठेवून आणखी ३ हजार रुपये पाठवले.

मात्र तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्या सवाई निघाल्याचे आणि आपल्यालाच फसवत असल्याचे या सायबर चोराच्या लक्षात आले. माझं कुटुंब आहे, बायका पोरं आहेत, माझ्यावर बिकट परिस्थिती ओढवेल. मी माझ्या बायकोला काय उत्तर देणार, अशी विनवणी तो भूपेंद्रकडे करू लागला. मात्र तोपर्यंत भूपेंद्रने संपूर्ण प्रकाराची कल्पना पोलिसांना दिली. तसेच हे पैसे कुठल्या तरी गरजू व्यक्तीला दान देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र चोरावर मोर ठरलेल्या या भूपेंद्रची आता परिसरामध्ये एकच चर्चा सुरू आहे.  

Web Title: Peacock on the thief! The young man cheated the person who tried to cheat him online, recovered thousands of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.