‘पीक विमा’ हे मोदी सरकारचे हुकमाचे पान
By Admin | Published: February 9, 2016 03:48 AM2016-02-09T03:48:55+5:302016-02-09T03:48:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत. याच विषयाला केंद्रबिंदू बनवून फेब्रुवारीमध्ये त्यांच्या ४ राज्यांत ४ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. दहा कोटींपेक्षा अधिक सदस्य, योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकारचे प्रभावी नेटवर्क, ‘मन की बात’चे देशभर थेट प्रसारण या साऱ्या गोष्टी असताना जाहीर सभांची इतकी मेहनत खुद्द पंतप्रधान कशासाठी करीत आहेत, अशी चर्चा सध्या राजधानीत सुरू आहे.
मोदी सरकारची पीक विमा योजना युपीएच्या मनरेगाइतकीच प्रभावी आहे. ग्रामीण जनतेच्या ती दीर्घकाळ लक्षात राहू शकते. पीक विम्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे सारे श्रेय भाजपलाच मिळायला हवे, असे भाजप नेत्यांना वाटते. पंतप्रधानांच्या ४ सभांमुळे ही योजना ग्रामीण शेतकऱ्यांच्या मनात देशभर ठसवली जाऊ शकते; मात्र पंतप्रधानांच्या सभा जागोजागी आयोजित करण्यामागे केवळ तितकेच कारण नाही.
मोदी सरकार सत्तेवर येऊ न २0 महिने उलटले. भाजप आणि केंद्र सरकारने जनतेशी जोडणाऱ्या अनेक योजनांच्या घोषणा या काळात केल्या. त्यापैकी अनेक योजनांची कार्यवाहीही सुरू झाली आहे. तरीही सर्वसामान्य जनतेत मोदी सरकारची प्रतिमा जशी हवी तितकी उंचावली नाही. उलट विरोधकांच्या आरोपांमुळे सरकारच्या विरोधातल्या नकारात्मक प्रचारालाच अधिक महत्त्व मिळत आहे. भू संपादन विधेयकाचे बुमरँग सरकारवर उलटले. केंद्र सरकार फक्त उद्योगपतींचे हितसंबंध सांभाळत असून, ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असा संदेश त्यातून पोहोचला. दादरीत अखलाकच्या हत्येनंतर भाजप आणि सरकारच्या विरोधात असहिष्णुतेच्या आरोपांचे वातावरण तापत गेले. जनतेच्या मनात साचलेली सरकारविरोधी ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी पीक विम्याचे निमित्त साधून ग्रामीण जनतेला नव्याने साद घालण्याचे ठरवले आहे.
यंदा ५, तर पुढील वर्षी ६ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. यापैकी बहुतांश राज्यांत शेतीचे क्षेत्र मोठे आहे. या राज्यांमधे अपेक्षित यश न मिळाल्यास केंद्राच्या विरोधातील नकारात्मक वातावरण वाढतच जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यापूर्वी विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी भाजपने पीक विमा योजनेला हुकमाचे पान बनवले असून पंतप्रधानांच्या सभांद्वारे त्याचा प्रभावी प्रचार करण्याचे ठरवले आहे.