शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, 25 जखमी; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:58 PM2024-02-21T17:58:13+5:302024-02-21T18:02:01+5:30
या आंदोलक शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर जबरदस्तीने बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला, याच वेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट उडाली अन्...
आपल्या मागण्यांना घेऊन सरकार विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर एकत्रित करत आहेत. दिल्लीकडे कूच करण्याची या शेतकऱ्यांची योजना आहे. मात्र, या दोन्ही सीमांवर पोलिसांनी या शेतकरी आंदोलकांना रोखून धरले आहे. यातच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन पुन्हा एकदा हिंसक केले आहे.
या आंदोलक शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर जबरदस्तीने बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला, याच वेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट उडाली. यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाटी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एवढेच नाही, तर पोलिसांनी रबरी गोळ्यांचा वापरही केला. या घटनेत 20 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमी शेतकरी आंदोलकांपैकी दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांवर शंभू येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींपैकी तीन शेतकऱ्यांना पटियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरचे सिव्हिल सर्जन डॉ कृपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला राजींद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे बंद केले आहे.
नेमकं काय आणि कसं घडलं? -
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी काही शेतकरी पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे जात होते. शेतकरी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कुच करण्याच्या प्रयत्नात होते. शेतकऱ्यांचे हे हिंसक आंदोलन पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चा सांभाळला. यावेळी त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला.