Pegasus spyware row: पेगॅससच्या माध्यमातून अनिल अंबानींवरही पाळत?; उद्योजक वर्तुळात मोठी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:51 PM2021-07-22T22:51:59+5:302021-07-22T22:58:53+5:30
Pegasus spyware row: उद्योगपती अनिल अंबानी यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा संशय
नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समोर आलेल्या पेगॅसस प्रकरणानं एकच खळबळ माजवली. केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि वरिष्ठ पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकाराला धारेवर धरलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला. पेगॅसस स्पायवेयरच्या माध्यमातून सरकार फोन टॅप करत असल्याचं वृत्त समोर आल्यानं राजकारण ढवळून निघालं. यानंतर आता नवी माहिती समोर आली असून त्यामुळे आणखी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
पेगॅसस स्पायवेयरच्या माध्यमातून टॅप केल्या जाणाऱ्या फोन नंबर्सच्या यादीत उद्योगपती अनिल अंबानी यांचा नंबर होता असं वृत्त द वायरनं दिलं आहे. अंबानी यांच्यासोबतच दसॉ एव्हिएशनचे भारतातील प्रतिनिधी वेंकटा राव पोसिना यांचाही नंबर 'पोटिन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होता, असं वृत्त द वायरनं दिलं आहे. राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना, भारतात आणि फ्रान्समध्ये त्याची जोरदार चर्चा असताना आणि फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी दसॉ कंपनीच्या भारतीय ऑफसेट भागिदाराबद्दल (रिलायन्स डिफेन्स) संशय व्यक्त केला असताना अनिल अंबानींचा फोन 'पोटेन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होता. पेगॅसस स्पायवेयर तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ समूहानं विकसित केलं आहे. या स्पायवेअरचा वापर करून व्यक्तींवर पाळत ठेवता येते.
देशात राफेल विमानांच्या व्यवहारावरून वादळ उठलं असताना अनिल अंबानी आणि वेंकटा राव पोसिना यांचे नंबर टॅपिंगच्या यादीत होते. यांच्यासोबतच रिलायन्स एडीए समूहाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख टोनी जेसुडॅसन आणि त्यांची पत्नी यांचेही मोबाईल क्रमांक त्या यादीत असल्याचं वायरनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या व्यक्तींचे फोन नंबर 'पोटिन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होते. त्यामुळे त्यांचे फोन टॅप झाले, असं म्हणता येणार नाही. डिजिटल फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच याबद्दल स्पष्टता होऊ शकेल.