पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:09 PM2024-06-13T12:09:30+5:302024-06-13T12:10:29+5:30

बुधवारीच झालेल्या बैठकीत पेमा खांडू यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

Pema Khandu Sworn In As Arunachal Pradesh Chief Minister | पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

इटानगर : पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. तर चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सुद्धा उपस्थित आहेत.

बुधवारीच झालेल्या बैठकीत पेमा खांडू यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीत भाजपाचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुगही सहभागी झाले होते. नुकत्याच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या, तर एनपीपीने ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) ३ आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) दोन जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस एका जागेवर तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच येथे १९ एप्रिलला लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. 

दरम्यान, खेळ आणि संगीताची आवड असणारे पेमा खांडू हे गेल्या काही वर्षांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एक मोठे नेते म्हणून चर्चेत आले. कुशल निवडणूक रणनीतीकार म्हणून आपली प्रतिमा उभी करण्यात पेमा खांडू हे यशस्वी ठरले आहेत. त्यांचे वडील दोरजी खांडू राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते मोनपा जनजातीतून येतात. आपल्या रणनीतीमुळे पेमा खांडू यांनी या ईशान्येकडील राज्यात भाजपाचा विस्तार करत कमळ फुलवले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे. 

Web Title: Pema Khandu Sworn In As Arunachal Pradesh Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.