भारताचा नकाशा चुकल्यास जेलची हवा, 100 कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2016 10:57 PM2016-05-05T22:57:39+5:302016-05-05T22:57:39+5:30
भारताच्या नकाशा आता चुकीच्या पद्धतीनं दाखवलात तर तुम्हाला 7 वर्षांच्या तुरुंगवासासह 100 कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5- भारताच्या नकाशा आता चुकीच्या पद्धतीनं दाखवलात तर तुम्हाला 7 वर्षांच्या तुरुंगवासासह 100 कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारनं जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केलं आहे.
या बिलानुसार भारतीय नकाशात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा फेरफार करायचा असल्यास तुम्हाला आधी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता भारतीय नकाशाचं चुकीच्या पद्धतीनं चित्रण किंवा प्रसार करता येणार नाही. अनेकदा इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर भारतीय नकाशाच्या सीमा चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या जातात. काही दिवसांपूर्वीच टि्वटरच्या माध्यमातून भारताच्या नकाशात काश्मीर चीनचा भाग तर जम्मू पाकिस्तानात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं त्या नकाशात सुधारणा केली होती. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं हे बिल तयार केलं आहे.
या बिलात नमूद केलेल्या अटींनुसार चुकीच्या नकाशा दाखवणा-यांना 1 कोटींपासून 100 कोटींपर्यंत दंड आणि 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सॅटलाइट, एअरक्राफ्ट, एअरशिप, बलूनच्या माध्यमातून भारताचा चुकीचा नकाशा दाखवता येणार नाही. बिलानुसार तुम्हाला एक लायसन्स देण्यात येणार आहे. हे लायसन्स मिळाल्यावरच तुम्हाला सरकारच्या अटी आणि शर्थीनुसार नकाशात बदल अथवा फेरफार करता येणार आहे.